मुंबई : पाचवा-सहावा मार्ग नसल्याने उपनगरीय मार्गावरून धावणा-या मेल-एक्स्प्रेस ट्रेन, बोरीवली आणि अंधेरी स्थानकांजवळ असणारे वळणदार (क्रॉसिंग) मार्ग याचा फटका बसून गेल्या काही महिन्यांपासून लोकलचे वेळापत्रक कोलमडत आहे. मात्र यातील पाचवा मार्ग तात्पुरत्या स्वरूपात पुढील एका महिन्यात सुरू होणार असून, बोरीवली आणि अंधेरी स्थानकांजवळील वळणदार मार्गाचे काम चार ते पाच महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा सुधारण्यास जवळपास पाच महिने लागणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून पश्चिम रेल्वेच्या लोकल काही ना काही कारणास्तव उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेवर सुरू असलेली कामे आणि त्यातच मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी पर्यायी नसलेला मार्ग यामुळे सगळा गोंधळ उडून गाड्यांना लेट मार्क लागत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील सगळी कामे वेळेवर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. पश्चिम रेल्वेवर एमयूटीपी-१ मध्ये असणाऱ्या माहीम ते बोरीवली या पाचव्या मार्गाचे काम फक्त वान्द्रे ते सान्ताक्रूझ पट्ट्यात बाकी आहे. खारजवळ असणारा हार्बरवरील एका रेल्वे पुलाचा अडथळा या कामात येत आहे. जोपर्यंत दुसरा पूल तयार होत नाही तोपर्यंत सध्याचा पूल तोडण्यात येणार नाही. त्यामुळे हे काम पूर्ण करून पाचवा आणि सहावा मार्ग उपलब्ध होण्यास दोन ते तीन वर्षे लागणार आहे. तोपर्यंत पश्चिम रेल्वेवरील मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे आणि लोकल गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्यासाठी पाचवा मार्ग तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा मार्ग एक महिन्यात कार्यरत होणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी सांगितले. बोरीवली आणि अंधेरी स्थानकांजवळ वळणदार मार्ग (क्रॉसिंग) असून, त्यामुळेही अप आणि डाऊन मार्गांवरील लोकल गाड्यांना लेट मार्क लागत आहे. (प्रतिनिधी)
वक्तशीर पश्चिम रेल्वेसाठी प्रतीक्षा करा!
By admin | Updated: September 24, 2014 05:25 IST