नॅशनल पार्कमधील घटना : व्याघ्रदूतही सुखावले
मुंबई : बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या भेटीसाठी त्यांचे चाहते व्याकूळ असतात. पण मंगळवारी चक्क नॅशनल पार्कमध्ये एका वाघाने बिग बींचा चाहता असल्याप्रमाणे त्यांच्या गाडीचा तब्बल चार किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. या प्रकाराने त्यांच्यासोबत असलेले वनमंत्रीही थक्क झाले. सफरीनंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बिग बी यांनी वाघाने पाठलाग केल्याचा किस्सा ऐकवला, तेव्हा उपस्थित सगळेच चकित झाले.बोरीवली (पूर्व) येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (नॅशनल पार्क) राज्य शासनातर्फे वन्यजीव सप्ताह कार्यक्रम सोहळा मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला राज्याचे व्याघ्रदूत अमिताभ बच्चन मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. व्याघ्रदूत म्हणून निवड झाल्यानंतर बच्चन यांचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी चार तास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत त्यांनी नॅशनल पार्कची सफर केली. त्यावेळी एका वाघाने त्यांच्या गाडीचा तब्बल चार किलोमीटरपर्यंत पाठलाग केला.सफरीनंतर आयोजित कार्यक्रमात हा किस्सा सांगत बच्चन म्हणाले की, मुंबईतील माझ्या ४५ वर्षांच्या वास्तव्यात प्रथमच मी येथे भेट दिली असून येथील वन्यजीवन आणि परिसर मी पहिल्यांदा पहिला याचे मला दु:ख असल्याची भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली. या वेळी बिग बी यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या गाजलेल्या ‘अग्निपथ’मधील काव्यपंक्ती सादर केल्या. तसेच व्याघ्र संवर्धनासाठी आपण शासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही बच्चन यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ वन्यजिवांचे संरक्षण व संवर्धन याद्वारे वनसृष्टीची साखळी अबाधित राखण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे चंद्रपूर येथील ताडोबा आणि बोरीवली येथील संजय गांधी वन प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा आपण संकल्प केला आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना व्याघ्रदूत म्हणून योगदान देण्याची विनंती करताच त्यांनी दिलेला होकार आपल्यासाठी लाख मोलाचा असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.