वसंत भोईर,
वाडा- वाडा नगरपंचायतीचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून विलंब झाल्याने त्याबाबतची घोषणा होऊ शकली नाही. परंतु लवकरच ती होईल अशी माहिती येथे गुरुवारी आयोजिलेल्या ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमात महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री व पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी दिली. याबाबतचा प्रश्न राष्ट्रवादी काँगे्रसचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पठारे यांनी विचारला होता. लोकमतच्या ठाणे व पालघर आवृत्तीचे निवासी संपादक नंदकुमार टेणी यांनी ‘लोकमत आपल्या दारी’, जलमित्र अभियानाची माहिती दिली.या कार्यक्रमास वाडा पंचायत समितीचे सभापती अरूण गौड, उपसभापती नंदकुमार पाटील, जि.प. सदस्य, निलेश गंधे, किर्ती हावरे, भालचंद्र खोडके , सुवर्णा पडवले, प्रांत अधिकारी हरिश्चंद्र पाटील, तहसीलदार संदिप चव्हाण, गटविकास अधिकारी निखील ओसवाल, पंचायत समिती सदस्य जगन पाटील, नरेश काळे, माधुरी पाटील, माणिक म्हस्के, आश्विनी शेळके, शामा गायकर, मृणाली नडगे, मनसेचे उपजिल्हा प्रमुख गोविंद पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष संदिप पवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पठारे, मनसेचे तालुका सरचिटणीस देवेंद्र भानुशाली, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद शिंदे, राष्ट्रवादीचे अमिन शिंदू, गणेश पाटील व विविध खात्यांचे खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.> वाड्याच्या मुख्य चौकुलीवर आणि महत्वाच्या रस्त्यांवर प्रचंड अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या जनतेला आपली वाहने पार्क करण्यासाठी जागा उरलेली नाही, जागा मिळेल तेथे वाहने पार्क केली तर पोलीस हवा सोडून देतात. हे चुकीचे आहे एक तर हक्काचे पार्र्किंग द्या नाहीतर वाहनांच्या चाकातील हवा सोडणे बंद करा. अशी जनतेची मागणी आहे. ती कधी पूर्ण करणार? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद शिंदे यांनी लोकमत आपल्या दारी या कार्यक्रमात केला. मात्र त्याचे उत्तर देण्यास एकही अधिकारी समर्थ ठरला नाही. पोलीस निरिक्षक नवे असल्याने ते ही बेपत्ता होते. परंतु शिंदे यांच्या प्रश्नांनी उपस्थितांच्या काळजाला मात्र हात घातला. उत्तम प्रश्न विचारला अशी दाद त्यांनी मिळविली. कधीकधी तर खंडेश्वरी नाक्यावर वाहन उभे करून दीड-दोन किलोमीटर उन्हातान्हात तडफडत जावे लागते. परत यावे तर हवा सोडलेली, अशी हालत त्यांनी स्पष्ट केली असता हि बाब मंत्र्यांनी गांभर्याने घेवून जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.‘लोकमत आपल्या दारी’ आपल्या दारी या कार्यक्रमात शेवटी नागरिकांनी विविध प्रश्न व समस्या विचारल्या या नागरिकांच्या प्रश्नांना आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा व विविध खात्यांच्या खाते प्रमुखांनी समर्पक उत्तरे दिली.त्याच प्रमाणे मनसेचे उपजिल्हा प्रमुख यांनी जल स्वराज्य प्रकल्पाअंतर्गत अर्धवट राहिलेल्या पाणी योजना व त्यातील भ्रष्टाचारासंदर्भात प्रश्न विचारला असता पालघर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांनी जलस्वराज्य प्रकल्प -१ चार वर्षांपूर्वी बंद झाला आहे, त्यामुळे त्या बाबतच्या आक्षेपांबाबत चौकशी अंतीच उत्तर देता येईल असे सांगितले. त्यातील कामांवर स्थानिक मंडळीनी त्याचवेळी लक्ष ठेवले असते तर आज ही तक्रार करण्याची वेळच आली नसती असेही स्पष्ट केले. आता झाले ते झाले. असलेल्या त्रुटी आणि अपूर्णता दूर करून टप्पा -२ द्वारे ही कामे कशी पूर्ण होतील यावर लक्ष केंद्रीत करणे योग्य ठरेल असा सल्लाही त्यांनी दिला. मनसेचे सरचिटणीस देवेंद्र भानुशाली यांनी वाडा ग्रामीण रूग्णालय हे ३० खाटांचे असून त्याचा विस्तार १०० खाटांचा होण्याबाबतचा प्रस्ताव गेली अनेक वर्षे पडून आहे. तो मार्गी कधी लागणार असा प्रश्न केला. भिवंडी विक्रमगड, जव्हार, मोखाडा, या तालुक्यांसाठी वाडा हे मध्यवर्ती आहे. त्यामुळे हा विस्तार एकट्या वाड्यासाठी नव्हे तर या चारही तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. असता विचारला असता आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांच्याकडे याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी सांगितले.या कार्यक्रमात नागरिकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने बोलताना नवनिर्मीत पालघर जिल्हयाच्या मुख्यालयाला नुकतीच मंत्री मंडळाने दिलेली मंजुरी त्याच प्रमाणे केंद्र शासनाच्या निधीतून मनोर येथे उभारण्यात येत असलेल्या ‘वारली हाट’ त्यानंतर जव्हार येथे पर्यटन स्थळ विकसीत करणे, जिल्हयातील गड किल्ल्यांचे संवर्धन व विकास, आदि विकासासंदर्भातील धोरणात्मक निर्णयांची माहिती यावेळी सवरा यांनी उपस्थितांना सांगितले.कार्यक्रमांचे सूत्र संचालन मनिष पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या आयोजनात वाडा वार्ताहर वसंत भोईर वितरण विभागाचे जगदिश पांडे, उत्तम लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास शेकडोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी मंत्र्यांनी लोकमतच्या दोनही उपक्रमांचा मनापासून गौरव केला. तसेच यामध्ये जनतेने जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले. यावेळी हॉलच्या बाहेरही अनेक मान्यवर उभे होते. अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच आयोजित केल्याबद्दल उपस्थितांनी लोकमतला मनपूर्वक धन्यवाद दिलेत.