डॉ. किरण वाघमारे / अकोला : कार्यालयात येणार्या प्रत्येक व्यक्तीचे समाधान व्हावे, त्याला त्याचे काम कधी होणार याची माहिती असावी यासोबतच बिनकामी येणार्यांवर चाप बसण्यासाठी येथील उपविभागीय कार्यालात ३१ डिसेंबर पासून व्हिजिटिंग मॅनेजमेंट सिस्टिम सुरु करण्यात येत आहे. अशा प्रकारची सेवा देणारे हे राज्यातील पहिले प्रशासकीय कार्यालय ठरणार आहे. उपविभागीय कार्यालयात दररोज विविध कामांसाठी लोक येत असतात. अनेकवेळा त्यांची कामे करुन घेण्यासाठी त्यांना चकरा माराव्या लागतात. साहेब भेटतीलच, असे नाही. साहेब असले तरी त्यांच्या मागे कामाचा व्याप, मग भेट होत नाही. भेट झाली तरी केवळ काम होऊन जाईल असे आश्वासन मिळते. प्रत्यक्षात काम होईलच याची काही शाश्वती नसते. कधी एखाद्या व्यक्तिचे काम दुसर्या कार्यालयाशी संबंधीत असते, पण तो चकरा मारतो उपविभागीय कार्यालयात. व्यवस्थित मार्गदर्शन नसल्यामुळे त्या व्यक्तिचा वेळ आणि श्रम वाया जाते. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी काढला आहे. खडसे यांनी आपल्या एका मित्राच्या सहकार्याने ह्यव्हिजिटिंग मॅनेजमेंट सिस्टिमह्णही कार्यप्रणाली आपल्या कार्यालयात लावली आहे. या सिस्टिममध्ये त्यांच्या कार्यालयात येणार्या प्रत्येक व्यक्तीची ऑनलाईल नोंद तसेच छायाचित्र घेतले जाईल. त्यांच्या कामाची त्यांना पावती दिली जाणार आहे. काम किती दिवसात होईल याची माहिती एसएमएस वर संबंधित व्यक्तीला कळविली जाईल. चुकून दुसर्या कार्यालयातील काम घेऊन आलेल्या व्यक्तिला त्यांचे काम कोणत्या कार्यालयातील आहे, याची देखील माहिती एसएमएसवर कळविली जाईल. या सर्व बाबी उपविभागीय अधिकार्यांच्या संगणकाशी जुळलेले राहणार आहे. याशिवाय आवक-जावक विभाग देखील ऑनलाईन करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांचा चकरा मारण्याचा त्रास कमी होण्यास मदत होईल. व्हिजिटिंग मॅनेजमेंट सिस्टिम ही अतिशय उपयुक्त आहे. या सिस्टिममुळे लोकांचा त्रास वाचणार आहे. त्यांना वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. सोबतच कामाची माहिती एसएमएसवर मिळाल्यामुळे त्यांना आपले काम कधी होईल याची चिंता करीत बसावे लागणार नाही. ही प्रणाली निश्चितच सर्वांसाठी उपयोगी ठरेल, असा विश्वास उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी व्यक्त केला.
अकोल्यात आजपासून ‘व्हिजिटिंग मॅनेजमेंट सिस्टिम’
By admin | Updated: December 31, 2014 00:18 IST