ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १२ - ऊसाला रास्त भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पुण्यातील साखर संकुलात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज ऊसाला रास्त भाव मिळावा यासाठी आंदोलनाचा मार्ग निवडला. विशेष म्हणजे भाजपासोबत निवडणूक एकत्र लढलेल्या व सध्याच्या सरकारचे सहकारी मानले गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतक-यांच्या हितासाठी आपल्याच सरकारलाही विरोध केला जाईलल हे स्पष्ट केले आहे. साखर संकुलात तोडफोड झाल्यामुळे आणि पार्किंगमधली एक गाडी जाळण्यात आल्यामुळे पोलीसांनी आंदोलकर्त्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
दरम्यान आमचे आंदोलन शांततपूर्ण असल्याचे व जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. तर, ज्या युती सरकारने राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी नेत्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली होती, त्याच सरकारने सहकारी नेत्यांना तुरुंगात टाकल्याची जळजळित प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे. सदाभाऊ खोत व राजू शेट्टी यांनी आपण जामीन घेणार नसल्याचे सांगत तुरुंगात राहणार असल्याचे व आंदोलन करणार असल्याचे सांगितले.