ऑनलाइन लोकमत
तुमसर (भंडारा), दि. 17 - भाजपतर्फे आयोजित तिरंगा रॅलीचा समारोपीय कार्यक्रमादरम्यान एका भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी संतापलेले भंडाऱ्याचे आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी पोलीस ठाण्यातच पोलीस कर्मचाऱ्याच्या थोबाडीत हाणली. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणाने तुमसर पोलीस ठाण्यात गदारोळ माजला असून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपतर्फे ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. लाखांदूर येथून सुरुवात झालेल्या या रॅलीचा समारोप तुमसर येथे सायंकाळी झाला. दरम्यान रात्री ८ वाजताच्या सुमारास रॅलीच्या समारोप प्रसंगी भाजपचा एक कार्यकर्ता रस्त्याच्या बाजूला चारचाकी वाहन उभे करून कार्यक्रमाची व्हिडीओ क्लिपिंग करीत होता. ही बाब पोलीस कर्मचारी राजू साठवणे यांना खटकली. साठवणे यांनी सदर कार्यकर्त्याला हटकले व पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्या कानशिलात हाणली. तसेच तंबी देऊन वाहन अन्यत्र हलविण्याचे सांगितले.पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार भाजप कार्यकर्त्यांनी आमदार अॅड.अवसरे यांना सांगितला. माहिती होताच संतापाच्या भरात आमदार अवसरे हे तुमसर पोलीस ठाण्यात शिरले. तसेच पोलीस कर्मचारी याला बोलावून काहीच न बोलता त्याला मारहाण करायला सुरुवात केली. याची माहिती शहरात होताच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात गोळा झाले. वृत्त लिहिपर्यंत पोलीस कर्मचारी साठवणे यांच्या तक्रारीवरून आमदार अॅड. अवसरे यांच्याविरुद्ध भादंविच्या ३५३ कलमान्वये गुन्हा दाखल केला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र शेट्टे यांनी दिली.