ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 14 - 'वाघ्या-मुरळी', 'भारूड', 'भराडी', 'वासुदेव', 'खाप-या', 'कोरकू नृत्य', 'झेंडवाई', 'गोंधळ', 'ठावा', 'जात्यावरचे गाणे'..... ही सर्व नावं आपल्या या पिढीला कदाचित माहिती नसतील पण या नावांनी ओळखल्या जाणा-या लोककलांनीच महाराष्ट्राचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले आहे. काळाच्या ओघात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाला समृद्ध करणा-या या लोककलांचा वारसा दिवसेंदिवेस लोप पावत आहे. या कला पुढच्या पिढीमध्ये प्रवाहित करण्यासाठी आता कलावंतच समोर आले असून अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये याच लोककलांच्या वैभवशाली आणि समृद्ध वारशाचा 'जागर' करण्यात आला.
महाराष्ट्रातील विविध लोककलांच्या 'जागर लोककलांचा' या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमात वाघ्या-मुरळी', 'भारूड', 'भराडी', 'वासुदेव', 'खापºया', 'कोरकू नृत्य', 'झेंडवाई' अशा एक ना अनेक कलाप्रकारांनी अकोटकरांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडलेय... अकोट जेसीआय या संस्थेने हे आयोजन केलं होते अकोट येथील जे.सी.आय.' अर्थातच 'जुनिअर चेम्बर्स इंटरनेशनल; ही संस्था दरवर्षीच्या आगळ्या-वेगळ्या अन 'हटके' 'फैशन शो' चे आयोजन करते. याआधी या संस्थेने अकोट येथे गाय, बैल, कुत्रा, ऑटो, बैल-गाडी अशा कृषी संस्कृतीशी नाते सांगणाºया घटकांचे 'फैशन शो' आयोजित केले होते. यावर्षी मात्र लोककलांचा जागर करून यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वालाच वंदन केले आहे.