ऑनलाइन लोकमत/शिखरचंद बागरेचावाशिम, दि. 1 - टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी अंगावर शहारे आणणाऱ्या जीवघेण्या कसरती आपल्या चिमुकल्यांकडून एका मातेला करून घ्याव्या लागत असल्याचे विदारक सत्य वाशिम शहरात रविवारी पाहायला मिळाले. समाजातील आजही एक वर्ग अत्यंत उपेक्षित आणि दारिद्र्यरेषेखालचे जीवन जगत आहे. शिक्षणाअभावी या वर्गातील लोकांना पोट भरण्यासाठी स्वत:सह मुलांकडून जिवावर बेतणारे काम करून घ्यावे लागते. याचा प्रत्यय वाशिम शहरात रविवारी आला. एकीकडे भ्रष्टाचार करून आरामाचे जीवन जगणारी मंडळी उजळ माथ्याने फिरतात, तर दुसरीकडे टीचभर पोट भरून स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी उपेक्षित घटकातील अशिक्षित वर्ग जिवावर बेतणारे प्रयोगही करायला घाबरत नाहीत. वाशिम शहरात एक महिला आपल्या चार अपत्यांसह कोल्हाट्याचा खेळ करून मिळणाऱ्या भिक्षेत आपली मुले जगविण्यासाठी फिरताना दिसली. आपल्या अवघ्या अडीच वर्षे वयाच्या बाळाचे शरीर अगदी अंगावर शहारे येण्याइतपत वेड्यावाकड्या पद्धतीने वाकविणे, सहा आणि आठ वर्षे वयाच्या इतर दोन मुलींसह अडीच वर्षाच्या बाळालाही दोन फूट परिघाच्या लोखंडी रिंगमधून एकाच वेळी घुसविणे आणि बाहेर काढण्यासारखे थरारक प्रयोग ही महिला सादर करते. विशेष म्हणजे तिच्या अडीच वर्षे वयाच्या बाळाच्या हे अंगवळणीही पडले असून, आईने सांगताच ते बालक थोरल्या बहिणींसह थरारक कसरती अगदी आनंदाने करते. मूळची अकोला जिल्ह्यात राहणारी ही महिला दोन दिवसांपासून वाशिम शहरात फिरत चिमुकल्यांच्या कसरती सादर करून त्यांच्यासह आपले पोट भरत आहे.
VIDEO- टीचभर पोटासाठी चिमुकल्यांच्या जीवघेण्या कसरती
By admin | Updated: January 1, 2017 19:53 IST