ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. ५ - गणेशोत्सवनिमित्ताने गणेशाची विविध रुपे ठिकठिकाणी साकारली जातात. मात्र या उत्सवात शेतक-यांची आत्महत्या वाचविणारा खामगावातील ‘गणेश’ कापूसपट्टा म्हणून ओळख असलेल्या खामगाव परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. खामगाव परिसर ही एकेकाळी कापसाची बाजारपेठ म्हणून प्रसिध्द होती. मात्र सर्वत्र असलेल्या दुष्काळी परिस्थितीत येथील चित्र सुध्दा काहिसे असेच आहे.
राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले असताना परिसरातही अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. वाढत्या शेतकरी आत्महत्येचे विदारक वास्तवामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. यासाठी शासनस्तरावरुन विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.
मात्र तरीही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी झालेले नाही. तेव्हा गणेशोत्सव या सामाजिक व धार्मिक उत्सवातून प्रभावी प्रबोधनाचा प्रयत्न शहरातील सतीफ रेखा प्लॉट भागात असलेल्या छोटा हनुमान बालगणेश मंडळाने केला आहे.
यावर्षी या मंडळाने गळफास घेणा-या शेतक-याला वाचविणारी गणेशमूर्ती साकारली आहे. गणेशोत्सवातून सामाजिक प्रबोधन हे महत्वाचे आहे. जीवन हे अनमोल आहे. संकट कोणतेही असो त्यावर मात करण्यासाठी मार्ग असतोच आत्महत्या हा पर्याय नाही. उलट आत्महत्येने संकटांवर उपाय तर होतच नाही तर परिवारावरील संकटे वाढतात. हाच संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.
गतवर्षीही या मंडळाने सर्वसामान्यांच्या निगडित याच प्रश्नावर शेतीचा पूरक जोडधंदा ठेवा, चांगल्या कामात कोणताही कमीपणा नसतो हे बिंबविण्यासाठी ‘दुधवाला गणेश’ स्थापन केला होता. याच माध्यमातून वाढते प्रदूषण रोखण्यासाठी ‘सायकल चालवा प्रदूषण वाचवा, आरोग्य टिकवा’ असा संदेश सुध्दा देण्यात आला होता.
लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणारा व आज गरज बनलेली गणेशोत्सवाची खरी संकल्पना या बालकांच्या गणेश मंडळाकडून प्रत्यक्षात उतरविली जात आहे. आत्महत्या न करण्याचा शेतकरी बांधवानी संकल्प करावा, असा संदेश ही गणेशमूर्ती देत आहे.‘ओंजळीत माझ्या तूच खेळतोस, कुशीतही लोळतोस तू, अन्नदाता तू या विश्वाचा, मी देव जरी बळीराजा तू.