ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १४ - शहरातील सोमेश्वर येथील दूधसागर धबधबा पुन्हा एकदा खळाळून वाहू लागला आहे.
नाशिक शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सोमेश्वर देवस्थानच्या जवळच हा धबधबा असून शहरातील नागरिकांचा तो आवडता पिकनिक स्पॉट आहे. या भागात दररोज शेकडो नागरिक सहकुटुंब येतात. अत्यंत वेगाने उसळून वाहणाऱ्या या धबधब्याला दूधसागर हे तो वाहताना दिसणाऱ्या शुभ्रत्यावरून देण्यात आले आहे. चालू वर्षी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद झाल्याने आणि गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडल्याने नागरिकांना शुष्क धबधब्याचे स्वरूप पहावे लागत होते. मात्र गेल्या शनिवार पासून झालेल्या संततधार पावसामुळे हा धबधबा पुन्हा एकदा वाहू लागला आहे. याच ठिकाणी बालाजी मंदिर असून तिरुपती देवस्थान ने दिलेली मूर्ती प्रतिष्ठापीत करण्यात आली आहे. त्यामुळे धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्यांना बालाजी दर्शनासाठी जाता येते.