अझहर शेख/ आॅनलाइन लोकमत
नाशिक, दि. 9 - जिल्ह्यातील चांदवडमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक रंगमहालाला लवकरच झळाळी येणार आहे. राज्याच्या पुरातत्व विभागाने याबाबत गांभीर्याने लक्ष घालून युद्धपातळीवर नूतनीकरणाचे काम सुरू केल्याने रंगमहालाचे रुप पालटणार आहे.चांदवड गावामध्ये अहल्यादेवी होळकर यांचा पुरातन राजवाडा आहे. हा राजवाडा रंगमहाल म्हणून सर्वत्र प्रसिध्द आहे. या पुरातन वास्तूची स्थापत्यकला ही अत्यंत अद्भूत आहे. वाड्याच्या मुख्यप्रवेशद्वार दगडी आहे. वाड्यामधील लाकडी नक्षीकाम व कलाकुसर अतिशय देखणी आहे. काळानुरूप या कलाकुसरीची दुरवस्था झाली होती. वाड्याची अनेक ठिकाणी पडझड होत असल्याने इतिहासप्रमी व पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. एक मजली रंगमहालाचे रुपडे पालटणार आहे. कारण राज्याच्या पुरातत्व विभागाने या रंगमहालाची दुरूस्ती व नुतनीकरणाचे काम हाती घेतले आहे.महाराष्ट्र शासनाकडून राज्य पुरातत्व विभागाकडून नुतनीकरणाचे काम सुरू आहे. ऐतिहासीक वास्तूची देखभाल दुरूस्ती आणि जतन या अंतर्गत रंगमहालाचे काम शासनामार्फत सुरू आहे. दोन टप्प्यांमध्ये राजवाड्याचे बांधकाम सुरू आहे. दुरूस्ती व नुतनीकरणाचा पहिला टप्पा पुर्ण झालेला असून दुसऱ्या टप्प्यातील कामही पुर्णत्वाकडे आहे. यापुर्वी रंगमहालामध्ये सर्व शासकिय कार्यालये होती. पुरातत्व विभागाने सर्व कार्यालये काढली आणि १७६७-१७९५ या होळकरांच्या राज्यकाळात रंगमहालाचे रुपडे कसे असेल त्याचा अभ्यास पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी करुन त्यानुसार दुरूस्तीच्या कामाचे नियोजन केले. काळानुरूप रंगमहालाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. रंगमहालाभोवती असलेली तटबंदीही ढासळत होती. मागील बाजूने तटबंदीची भिंत मोठ्या प्रमाणात पडली होती. पुरातत्व विभागाने संपुर्ण रंगमहालाची पाहणी करुन सर्वप्रथम तटबंदीची होणारी पडझड रोखली. भींतीचे बांधकाम पुर्ण केले. रंगमहालावरील कौलांची तोडफोड झाली होती. त्यामुळे कौलं बदलण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. सागवान लाकडाचा रंगमहालामध्ये करण्यात आलेला वापर व त्यावरील सुबक कलाकुसरला पॉलिश करण्यात येत आहे. यामुळे रंगमहालाला झळाळी येत आहे.रंगमहालाची विहीर भागवते तहानरंगमहालाच्या मागील बाजूस अहल्यादेवी यांनी बांधलेली प्रचंड मोठी बारव असून या बारवचे पाणी बारामाही आटत नाही. या बारवच्या पाण्यावरच चांदवड गावाची तहान भागते असे बोलले जाते. बारवचा जलसाठा उत्तम आहे; मात्र मागील अनेक वर्षांपासून बारवमधील गाळाचा उपसा करण्यात आलेला नाही. तसेच बारवच्या कठड्यांची पडझड झाली असून झाडेझुडपे वाढली आहेत.राज्य पुरातत्व विभागामार्फत शासनाकडून रंगमहाल जतन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. नुतनीकरणाचा पहिला टप्पा पुर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचे कामही येत्या फेब्रुवारी माहिन्यात पुर्णत्वास येणार आहे. पडझडीच्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी प्रामुख्याने चुणा वापरला जात आहे. होळकरांचा हा रंगमहाल इतिहासाची साक्षीदार असून त्याचे जतन के ले जात आहे. - डॉ. श्रीकांत घारपुरे, सहाय्यक संचालक, राज्य पुरातत्व विभाग