ऑनलाइन लोकमत
बीड - सिव्हिल हॉस्पीटलमध्ये अवघ्या आठवडाभरात दुस-यांदा पुन्हा आरोग्य कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने रूग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. गेली काही महिन्यांपासून सिव्हिल हॉस्पिटलला राजकीय आखाड्याचे स्वरूप आले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांत कुरघोडीची चढाओढ लागली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक अशोक बोल्डे विरूध्द आरोग्य कर्मचारी असा संघर्ष पार टीपेला पोहोचला आहे.
सोमवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान झालेल्या अपघातात माधुरी गोरे या नर्स मृत्यूमुखी पडल्या. यानंतर संतप्त झालेल्या कर्मचा-यांनी दुपारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. गोरे यांचा झालेला अपघात ही दुर्दैवीच घटना आहे. सकाळी ड्युटीवर आल्यानंतर त्या आणि शीला मुंडे या दोघी हॉस्पीटलमधून बाहेर कशासाठी पडल्या होत्या आणि त्या नेमके कोठे निघाल्या होत्या, याची माहिती सध्या तरी कोणाकडेही नाही. मुंडे यांना या अपघाताचा मोठा धक्का बसला असल्याने तुर्त तरी त्यांची प्रकृती ठिक झाल्यानंतरच याचा खुलासा होईल. परंतु आता या अनुषंगाने एक माहिती अशी येत आहे की, त्या दोघी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी बोल्डे यांनी रात्रीच्या वेळी हॉस्पीटलमध्ये राऊंड मारत कामावर झोपलेल्या कर्मचा-यांचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याचा संताप दोन दिवसांपासून कर्मचा-यांमध्ये धुमसत होता. आठ दिवसापूर्वी बोल्डे यांच्या विरोधात कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन केले होते, त्यावेळीही रात्रपाळीत झोपलेल्या कर्मचाºयांला त्यानी मारहाण केल्याचा आरोप होता. तर कामावर झोपा काढणाराला आपण झापले होते, असे बोल्डे यांचे म्हणणे होते.
आंदोलनानंतर दोन दिवसांनी बोल्डे यांनी मध्यरात्री पुन्हा राऊंड मारत कामावर झोपा काढणा-या कर्मचा-यांचे फोटो काढले आणि दोन दिवसांपूर्वी ते सोशल मीडियावरून फिरू लागले. या फोटो संदर्भातच या दोघी दुचाकीवरून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाकडे निघाल्या होत्या, असे एका कर्मचाºयाने सांगितले. कर्मचारी कामावर झोपला तर त्याला शिक्षा द्या, कारवाई करा, परंतु असे त्यांचे फोटो वायरल करणे, त्यांना योग्य वाटले नव्हते. त्यामुळेच त्या यासंदर्भातील एक निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यासाठी निघाल्या होत्या, असे त्या कर्मचाºयाचे म्हणणे आहे. यातील खरे खोटे आता शीला मुंडेच सांगू शकतात.
आज सुरू झालेले आंदोलन आता येथील मेट्रन यांची बदली झालेली असताना त्यांना रिलिव्ह का केले नाही, या मागणीसाठी होत असून कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करत असून त्यातूनच असा अपघात झाल्याचे कर्मचारी संघटनेचे नेत सांगत आहेत. बोल्डे विरूध्द कर्मचारी हा संघर्ष आता पुन्हा पेटला आहे. सतत या ना त्या कारणाने गेली वर्षभरापासून सिव्हिल हॉस्पीटल वादाच्या भोव-यात सापडलेले आहे. अधिकारी आणि कर्मचाºयांच्या वादात रूग्णांची हेळसांड सुरूच आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून आता या संघर्षाची दखल घेण्याची आवश्यकता आहे.