रद्दी गोळा करून करतात शिक्षणाचा खर्च : २८ मुलींची स्वीकारली जबाबदारीनागपूर : समाजात आजही अनेक मुली आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित आहेत. अशा मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी वसुंधरा चॅरिटेबल सोसायटीने स्वीकारली आहे. संवेदनांची जाणीव असणाऱ्या क ाही व्यक्तींनी या संस्थेची स्थापना केली असून, गेल्या चार वर्षापासून मुलींचे निवासी वसतिगृह चालवित आहे. यासाठी काही निधी स्वत:च्या खिशातून तर काही निधी रद्दी गोळा करून भागवित आहे. वैशालीनगर येथे वसुंधरा चॅरिटेबल सोसायटीद्वारे संचालित मुलींचे निवासी वसतिगृह आहे. येथे विदर्भातील अतिशय गरीब, आईवडिलांचे छत्र हरविलेल्या, कुणाला आई नाही, कुणाला वडील नाही अशा मुली ज्या शिक्षणापासून वंचित आहे, यांना निवाऱ्याबरोबरच शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या चार वर्षापासून हे वसतिगृह अतिशय जबाबदारीने कर्तव्य बजावत आहे. येथे मुलींना राहण्याची, खाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च संस्था पूर्ण करते. त्यांच्यासाठी बसची सोय, ट्यूशनची सोय करण्यात आली आहे. वर्ग ४ ते वर्ग ११ च्या मुली सध्या येथे निवासाला आहे. या उपक्रमासाठी संस्थेला महिन्याला ५० हजार रुपये खर्च लागतो. १३ हजार रुपये किराया तर वसतिगृहाचा द्यावा लागतो. संस्थेचे सदस्य स्वत:च्या खिशातून हा सर्व खर्च करतात. त्याचबरोबर दर रविवारी घरोघरी फिरून रद्दी गोळा करतात. ही रद्दी विकून आलेल्या पैशातून मुलींच्या शिक्षणावर खर्च करतात. संस्थेने केलेल्या सहकार्यामुळे या मुलींनी परीक्षेत भरघोस यश मिळविले आहे. एक मुलगी तर आयएएसची तयारी करीत आहे. या मुलींना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. वसुंधरा संस्थेचा झुनका भाकरचा स्टॉल उद्योजिक मेळाव्यात लागला आहे. या स्टॉलला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यातून गोळा झालेला निधी मुलींच्या शिक्षणावर खर्च करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)उपक्रमात योगदानसामाजिक कार्यकर्ते नागेश पाटील यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला सुरुवात झाली. सध्या ते संरक्षक म्हणून या उपक्रमाची जबाबदारी सांभाळत आहे. त्यांच्यासोबत हर्षा पाटील, मंजुषा गोटेकर, माधुरी रामटेके, मीना पाटील, स्मिता हाडके, सुनिता पाटील, माधुरी रंगारी, सचिन रामटेके, राजेश हाडके, मनीष पाटील यांचे या उपक्रमात संपूर्ण योगदान आहे. समाजानेही खारीचा वाटा स्वीकारावाया निराधार मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वसुंधरा शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे. यासाठी समाजातील काही सज्जनशील, क्रियाशील व्यक्तीच्या सहकार्याची गरज आहे. स्वत:च्या घासातला एक घास या चिमण्यांच्या मुखात घालावा, त्यांना मायेचे उबदार पांघरुण द्यावे. तरच हा आनंदाचा झरा अव्याहतपणे वाहत राहील, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
मुलींच्या शिक्षणासाठी वसुंधरेचे ममत्व
By admin | Updated: December 31, 2014 01:05 IST