ठाणे - यंदा काही सुट्या रविवारी आल्यामुळे चाकरमान्यांचा हिरमोड झाला होता. परंतु, पुढील वर्षी अर्थात २०१५ मध्ये एक सुटी वगळता अन्य २४ सुट्या इतर वारी येणार आहे. त्यामुळे येते वर्ष सुट्यांच्या दृष्टीने सुखावह ठरणार आहे. रविवारसह एकूण ७६ सुट्यांचा आनंद त्यांना लुटता येणार आहे.२०१४ मध्ये ३ सुट्या रविवारी आहेत, तर २०१३ मध्ये ५ सुट्या रविवारी होत्या. परंतु, २०१५ मध्ये केवळ ४ जानेवारीला ईद-ए-मिलादची एकमेव सुटी वगळता इतर २४ सुट्या अन्य वारी आहेत. पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी ही माहिती दिली. पाच सुट्या शनिवारी तर दोन सुट्या सोमवारी येणार आहेत. पाच सुट्या शुक्रवारी येणार आहेत. त्यामुळे जोडून आलेल्या सुट्यांचा फायदा घेत पर्यटनाची संधी साधता येणार आहे. दरवर्षी १४ जानेवारीला येणारी मकरसंक्रांत पुढील वर्षी १५ जानेवारीला येणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
२०१५मध्ये नोकरदारांसाठी सुट्यांचा सुकाळ
By admin | Updated: October 9, 2014 04:48 IST