मुंबई : अंधेरी व डोंबिवली परिसरात परवाना शस्त्राद्वारे हत्या करून झालेल्या खुनाची चौकशी सुरू आहे. दोन्ही गुन्ह्यात ११ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. भविष्यात असे गुन्हांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. देशात सीसीटीएनएस प्रणाली वापरणारे महाराष्टÑ एकमेव राज्य आहे. सीसीटीएनएसद्वारे एफआयआरची माहिती सर्व्हरवर आॅनलाइन मिळते. सर्व रेकॉर्ड डिजिटलाइज्ड होत असून, लवकरच फिंगर प्रिंट्सच्या मदतीने गुन्हेगारांची सर्व माहिती एकाच वेळी गुन्हे शाखेला आॅनलाइन उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.अंधेरी व डोंबिवली परिसरात झालेल्या गुन्ह्याबाबत सदस्य योगेश सागर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी सदस्य सुभाष भोईर, प्रवीण दरेकर यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता. सीसीटीएनएस अंतर्गत विश्लेषण करून त्याच्या माध्यमातून क्राइम मॅपिंग करता येणार आहे. यामुळे गुन्ह्याशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. एका क्लिकवर गुन्ह्याची सर्व विस्तृत माहिती आॅनलाइन उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:58 IST