कऱ्हाड : ‘जनता परिवाराच्या माध्यमातून बिहारमध्ये एप्रिल २०१४ मध्ये सहा पक्ष एकत्र आले; मात्र भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी समाजवादी पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडून त्यांना बिहारमध्ये स्वतंत्र लढायला लावले. हे पक्ष महागठबंधनमध्ये असते तर बिहारमध्ये आणखी जागा वाढल्या असत्या,’ असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण उपस्थित होते.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘एप्रिल २०१४ मध्ये मोदींना विरोध करण्यासाठी बिहारमध्ये नीतीशकुमार, लालूप्रसाद यादव यांच्यासह मुलायम यांचा सपा, राष्ट्रवादी काँग्रेस असे सहा पक्ष एकत्र आले होते. या आघाडीचा बिहारच्या निवडणुकीत मोठा फटका बसणार, हे गृहित धरून भाजपाचे धुरंदर अमित शहा यांनी चाली करून सपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या आघाडीतून फोडले. वेगवेगळे लढायला प्रवृत्त केले. यातून यादव, मुस्लीम मते वळतील, असा त्यांचा कयास होता. मात्र, तसे झाले नाही. मात्र हे पक्ष महागठबंधनमध्ये असते तर नीतीशकुमारांच्या आणखी जागा वाढल्या असत्या. भाजपाने बिहारची निवडणूक प्रतिष्ठेची करून ती जिंकण्यासाठी सर्व प्रकारची अस्त्रे वापरली होती. देशाच्या इतिहासात कोणत्याच पंतप्रधानांनी राज्याच्या निवडणुकीत घेतल्या नसतील, इतक्या ३५ सभा पंतप्रधानांनी बिहारमध्ये घेतल्या. केवळ विजयाचे श्रेय मोदींना मिळावे, यादृष्टीने प्रयत्न झाले. बिहारमध्ये महागठबंधन थोड्या फरकाने विजयी होईल, असा अंदाज होता. मात्र, अनपेक्षितपणे बिहारच्या जनतेने सत्ताधाऱ्यांना विजयी केले.या विजयाने मोदींना कुणीही पराजित करू शकत नाही, या समजाचा फुगा फुटला आहे. पंतप्रधानांनी आता बिहारला जाहीर केलेले सव्वालाख कोटींचे पॅकेज तत्काळ अदा करणे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेला जाहीर केलेले साडेसहा हजार कोटींचे पॅकेजही तत्काळ द्यावे, असेही ते म्हणाले.बिहारचा विजय हा देशाच्या राजकारणात मैलाचा दगड ठरणार असल्याचे सांगून चव्हाण पुढे म्हणाले, ‘पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळसह सहा राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या राज्यांतही भाजपाला फारसे यश मिळणार नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र निराशाजनक आहे. पंतप्रधानांचे परदेश दौरे सुरू आहेत. ते अजूनही कॅम्पेन मुडमध्ये आहेत. या दौऱ्यांना काहीही फायदा होताना दिसत नाही. उलट नेपाळ आणि भारताचे गेली कित्येक वर्षे चांगले असणारे संबंध बिघडले असून, भारतापेक्षा चीनशी व्यापाराला नेपाळने प्राधान्य दिले आहे, हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे,’ असेही ते यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)नीतीशकुमारांचे मोबाईलवरून केले कौतुकबिहारमधील निवडणुकीत विजय संपादन केल्याबद्दल मुख्यमंत्री नीतीशकुमार यांचे फोनवरून कौतुक केले असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. राज्यात भाजपा, सेना सरकारमध्ये एकमत नाही. मुंबई महापालिकेची निवडणूक दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची असल्याने शिवसेना कदाचित त्यापूर्वी सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत राज्यातील अन्य पक्षांच्या भूमिकेवर सरकारचे भवितव्य ठरण्याची शक्यता आहे. राज्यात पाणी टंचाईचे गंभीर संकट असून, सरकार याबाबत गंभीर नाही. सहकारमंत्री १ लाख संस्था बोगस असल्याचे सांगतात. त्यांनी केवळ घोषणा करण्यापेक्षा या संस्थांवर व त्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून कृती करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनावर आरोप केला असून, हेही चुकीचे असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
अपराजित मोदींचा फुगा फुटला
By admin | Updated: November 11, 2015 00:15 IST