पुणे: गेल्या काही वर्षांपासून एकाही मान्यताप्राप्त प्राध्यापकाची व प्राचार्यांची नियुक्त न केलेल्या 73 महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे प्रवेश चालू शैक्षणिक वर्षापासून थांबविण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतला असून या महाविद्यालयांची यादी गुरूवारी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार आहे.विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 73 महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे प्रवेश थांबविण्याचा निर्णय विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. संबंधित महाविद्यालयांनी पुढील तीन वर्षात प्राध्यापक व प्राचार्यांची नियुक्ती केली नाही तर ही महाविद्यालये आपोआप बंद पडणार आहेत. त्यामुळे या महाविद्यालयांना रिक्तपदे भरण्याशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ.व्ही.बी.गायकवाड म्हणाले,विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणे,अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील 73 महाविद्यालयांचे प्रवेश थांबविण्यात आले आहेत. संबंधित महाविद्यालयांना याबाबतची नोटीसही बजावली जाणार आहे. तसेच येत्या गुरूवारी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संबंधित महाविद्यालयांची यादीही प्रसिध्द केली जाणार आहे. या 73 पैकी काही महाविद्यालयांनी तीन वर्षापासून तर काही महाविद्यालयांनी 10 वर्षापासून एकाही मान्यता प्राप्त प्राध्यापकाची नियुक्ती केलेली नाही.त्यामुळे संबंधित महाविद्यालयांवर ही कारवाई करण्यात आली आहे.प्रवेश थांबविण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 17 नाशिक जिल्ह्यातील 10 आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 29 तर शहरी भागातील 17 महाविद्यालयांचा समावेश आहे,असे स्पष्ट करून गायकवाड म्हणाले,एकट्या पुणे जिल्ह्यातील 46 महाविद्यालयातील प्रवेश थांबविण्यात आले आहेत.परंतु,या महाविद्यालयांनी प्राध्यापक व प्राचार्य नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केल्यास त्यांना प्रथम वर्षाचे प्रवेश करण्यास मंजूरी दिली जाणार आहे.
विद्यापीठ 73 महाविद्यालयांची यादी प्रसिध्द करणार
By admin | Updated: June 4, 2014 22:37 IST