ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - मध्य रेल्वे मार्गावरील बिघाड दुरुस्त करण्यात आल्याची माहिती आहे. शुक्रवारी सकाळी 7.30 च्या सुमारास ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणा-या जलद मार्गावरील गाडया धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या.
सकाळी 8.25 च्या सुमारास वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याची माहिती आहे. ऐन कार्यालय गाठण्याच्यावेळेत मध्य रेल्वे कोलमडल्याने लाखो नोकरदार प्रवाशांचे हाल झाले. वाहतूक पूर्ववत झाली असली तरी, लोकल काही मिनिटे उशिराने धावत आहेत.
गर्दीच्यावेळी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा विस्कळीत होणे आता नित्याचेच झाले आहे. मागच्या आठवडयात वाशी पूलाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने हार्बर रेल्वेची सेवा कोलमडली होती. हा बिघाड सुद्धा सकाळी प्रवाशांची कार्यालय गाठण्याची घाई असते त्यावेळी झाला होता.