यदु जोशी,
मुंबई- आगामी नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, असे अधिकार भारतीय जनता पार्टीने स्वपक्षीयांना दिलेले असतानाच शिवसेनेकडून कोणीही स्थानिक पातळीवर भाजपा वा कोणाशीच युतीबाबत चर्चा करायची नाही, असे फर्मान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. स्थानिक स्वराज्य संस्थांची जिथे निवडणूक होत आहे अशा जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक मातोश्रीवर झाली. युतीचे काय करायचे ते आम्ही ठरवू. तुम्ही त्या बाबत काहीही बोलायचे नाही, असे उद्धव यांनी या बैठकीत सर्वांना बजावल्याची माहिती आहे. भाजपाचे प्राबल्य असलेल्या वा भाजपाने लक्ष केंद्रीत केलेल्या नगरपालिकांना गेल्या काही महिन्यांत राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी दिला पण शिवसेनेबाबत मात्र या अन्याय झाला असल्याची भावना काही जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांनी आजच्या बैठकीत व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना या बाबत विचारले असता त्यांनी दावा केला शिवसेनेशी चर्चा करूनच स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याबाबतची मुभा देण्याचे ठरले आहे. या बाबत आपण शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्याशी चर्चा केली होती.>शिवसेनेशी युती करण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा आम्ही दिली आहे आणि आतापर्यंत हेच होत आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीशी कोणत्याही परिस्थितीत युती करायची नाही, असे पक्षजनांना बजावण्यात आले आहे. अन्य लहान पक्ष वा स्थानिक आघाड्यांशी युतीबाबत चर्चा करायची असेल तर त्याची परवानगी प्रदेश नेतृत्वाकडून घ्यावी लागेल. - माधव भंडारी, भाजपाचे प्रवक्ते>तर स्वबळावर लढाभाजपा वाकड्यात शिरत असेल तर सरळ स्वबळावर लढा, असे आमचे नेतृत्व सांगते. मात्र, भाजपाच्या उमेदवारांना वरून कुमक मिळते आम्हाला स्वबळावर आणि स्वखर्चावर लढण्यास सांगितले जाते, अशी व्यथा शिवसेनेच्या एका जिल्हाप्रमुखाने नाव न देण्याच्या अटीवर व्यक्त केली.