ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - राज्यात सरकार बदलले असले तरी विदर्भातील शेतक-यांच्या जीवनात फरक पडल्याचे दिसत नाही. विदर्भात शेतक-यांच्या आत्महत्या सुरु असून हे चित्र विदारक आहे अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
विदर्भात एकाच दिवशी पाच शेतक-यांनी कर्ज, नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. शुक्रवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी शेतक-यांच्या आत्महत्येवरुन फडणवीस सरकारचे कान टोचले. मुख्यमंत्री फडणवीस दावोस येथे उद्योग परिषदेत देशाचे नेतृत्व करत असतानाच विदर्भातील शेतक-यांनी आत्महत्या करुन जीवन संपवावे हे भयंकर असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यात नवीन सरकार सत्तेत आल्यावर कर्ज, नापिकी आणि दुष्काळामुळे आत्महत्या करणा-या शेतक-यांचे प्रमाण कमी होईल अशी आशा होती. मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. आत्महत्या करणा-या शेतक-यांकडे मोबाईल फोनही नव्हते. त्यामुळे मोबाईल फोनची बिलं भरता पण कर्जाचे हफ्ते फेडत नाही असे या शेतक-यांना विचारता येणार असा टोमणाही ठाकरे यांनी भाजपा नेत्यांना लगावला. मुख्यमंत्री, अर्थमंत्री हे विदर्भातीलच असताना शेतकरी आत्महत्या करतो हे नवीन सरकारला शोभते का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.