अतुल कुलकर्णीलोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई महानगरपालिकेत स्वतःचा महापौर बसवायचा आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत महायुती राहील हे त्यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिका पुन्हा एकदा काबीज करायची आहे. त्यासाठी त्यांनी राज ठाकरे यांना सोबत घेतले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २२७ पैकी १३८ वॉर्डामध्ये आजही मराठी मतांचा टक्का जास्त आहे. उद्धव आणि राज दोघे एकत्र आल्यामुळे याच मराठी मतांवर त्याचा परिणाम होईल व त्याचा पहिला फटका शिंदेसेनेला बसेल, असे गणित मांडले जात आहे. या सगळ्यात महाविकास आघाडी मुंबईत एकत्र राहणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
मुंबईत शरद पवारांची व अजित पवारांची राष्ट्रवादी यांचा फारसा प्रभात उरलेला नाही. काँग्रेस अस्तित्वाची लढाई लढत आहे. त्यामुळे मुंबईत खरी लढत राज उद्धव आणि भाजप शिंदेसेनेची युती या दोघांमध्येच होईल. सगळ्यात जास्त बंडखोरी भाजपमध्येच होईल याची खात्री झाल्याने आपले उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत जाहीर करू नयेत असाही एक विचार आहे. ज्यांना शिंदेसेना आणि भाजपमध्ये उमेदवारी मिळणार नाही असे लोक राज उद्धव यांच्याकडे जातील अशीही भीती असू शकते.
शिवसेनेचे दोन गट झाले. एक गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत गेला. अनेक माजी नगरसेवक साथ सोडून गेले. मधल्या काळात अनेक माजी नगरसेवकांनी इकडून तिकडे उड्या मारल्या.
२०१७ मध्ये भाजप-शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४ नगरसेवक होते. त्यातले ४६ उद्धवसेनेमधून शिंदेसेनेत गेले. त्याशिवाय काँग्रेसचे ६, राष्ट्रवादीचे ५, एमआयएम व समाजवादी प्रत्येकी २ आणि मनसेचा १, असे १६ माजी नगरसेवकही शिंदेसेनेत गेले. त्यामुळे मुंबईत आज शिंदेसेनेकडे ६२ माजी नगरसेवक आहेत.
भाजपचे ८२ नगरसेवक होते. काँग्रेसचे ४, उद्धवसेनेचा १ व अपक्ष १, असे ६ नगरसेवक त्यांच्याकडे गेले. त्यामुळे भाजपकडे सध्या ८८ माजी नगरसेवक आहेत. २०१७ मध्ये निवडून आलेल्या ८४ पैकी ३७ आणि मनसेचे ६, अपक्ष ४ असे ४७ माजी नगरसेवक उद्धवसेनेसोबत आहेत. मात्र, या फोडाफोडीत मुंबईतला कार्यकर्ता, शाखाप्रमुख मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिला ही वस्तुस्थिती आहे.
चार दशकांपासून महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. उद्धव, राज एकत्र आले. हा प्रयोग मुंबईत चर्चेचा विषय आहे. दोघे मिळून कशा पद्धतीने मतदारांच्या समोर जाणार, यावर त्या दोघांचे आणि भाजप-शिंदेसेनेचे राजकीय गणित अवलंबून राहणार आहे. भाजपला सत्ता काबीज करण्यासाठी किमान १६० ते १७० जागा लढवायच्या आहेत. तर, शिंदेसेनेला १०० जागा हव्या आहेत. महापालिकेच्या २२७ जागांचे वाटप करताना शिंदेसेनेला ६० ते ७० जागांवर समाधान मानावे लागेल.
भाजपाला शिंदेसेनेसोबत १५० पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यातही भाजपला स्वतःला १०० पेक्षा जास्त जागा जिंकायची तीव्र इच्छा आहे. त्यासाठी त्यांना जागा देखील जास्त लढवाव्या लागणार आहेत. जो जास्त जागा लढवेल त्याची जिंकण्याची व महापौरपद मिळविण्याची शक्यता जास्त आहे.
एकूण प्रभाग, सदस्य संख्या २२७
मुंबईत २२७ पैकी १३८ वॉर्डामध्ये मराठी भाषिकांचे प्राबल्य आहे. त्यापैकी ५१ ते ८४ टक्क्यांमध्ये ५२ वॉर्ड आहेत. २३ ते ३५ टक्क्यांमध्ये २५ वॉर्ड आहेत. ४७वॉर्डामध्ये मुस्लीम समाजाचे प्राबल्य आहे. तर २८ वॉर्डामध्ये गुजराती/राजस्थानी समाजाचे आणि १०% वॉर्डामध्ये उत्तर भारतीयांचे प्राबल्य आहे. असे असले तरी समाज म्हणून अनेक वेळा मराठी मतदारांनी गुजराती उमेदवार तर मुस्लीम मतदारांनी मराठी मतदारही निवडून दिले आहेत. पण यावेळी मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा ही निवडणूक रंगतदार करू शकतो.
२०१७ चे संख्याबळ
शिवसेना - ८४
भाजप - ८२
काँग्रेस - ३१
राष्ट्रवादी - ९
मनसे - ७
समाजवादी - ६
एमआयएम - २
इतर - ६
काँग्रेसचे काय होणार?
मुंबई काँग्रेससाठी ही अस्तित्वाचीच लढाई आहे. दलित, मुस्लीम मतदार काँग्रेससाठी एकत्र येतील. राज यांच्यामुळे ते उद्धवसोबत जाणार नाही, असे काँग्रेसला वाटते. छोटे पक्ष सोबत घेण्याचा प्रयत्न करताना समाजवादी पक्षाने काँग्रेसला नकार दिला आहे.
राष्ट्रवादीचा फायदा कोणाला?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिक यांना पुढे करावे, अशी खेळी भाजपने पडद्याआड केली आहे. मलिक यांनी अबू आझमी यांच्या समाजवादी पक्ष ज्या-ज्या ठिकाणी जागा लढवेल त्या ठिकाणी आणि मुस्लीम बहुल मतदारसंघात उमेदवार उभे करावेत, अशी यामागे खेळी आहे.
उद्धव-राज एकत्र येण्याचे गणित काय?
उद्धव आणि राज यांच्यासाठी आज तरी सर्व २२७ जागा मोकळ्या आहेत. राज, उद्धव यांना खरोखर मुंबई महापालिकेत सत्ता आणायची असेल, तर त्यांच्या आजूबाजूच्या नेत्यांनी तिकीट वाटपाच्या वेळी भाजप-शिंदेसेना यांच्यासोबत पडद्याआड हातमिळवणी करू नये. उद्धव ठाकरे यांनी तिकीट वाटपात स्वतः लक्ष घालावे, तर आम्हाला संधी चांगली आहे, असे उद्धवसेनेचे कार्यकर्ते खासगीत सांगतात. ही प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते.
उद्धव-राज एकत्र येण्यामुळे नुकसान शिंदेसेनेला होईल, असे बोलले जाते. त्यामुळेच कदाचित भाजपने मुंबईत शिंदेसेनेला सोबत घ्यायचे ठरवले असावे. शिंदेसेनासोबत राहण्याने फायदा होत नसला, तरी नुकसान कमी होणार आहे. शिवाय ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नवी मुंबई येथे भाजपला त्यातून फायदाच दिसत असावा.
मागील निवडणुकीत एकूण मतदार किती ?
एकूण - ९१,८०,६५४
पुरुष - ५०,३०,४५९
महिला - ४१,४९, ८१४
इतर - ३,८१४
आता एकूण किती मतदार ?
एकूण - १,०३,४४,३१५
पुरुष - ५५,१६,७०७
महिला - ४८,२६,५०९
इतर - १,०९९
वाढलेल्या मतदारसंख्येचा लाभ कुणाला होणार?
या निवडणुकीत ११,६३,६६१ मतदार वाढले आहेत. ही वाढ बहुभाषिक असली तरी संपूर्ण २२७ मतदारसंघात विभागलेली आहे. २०१७ च्या निवडणुकीत ६५% मराठी मतदार होते. त्या खालोखाल २३% मुस्लीम मतदार होते. याही वेळी हे प्रमाण असेच आहे. राज-उद्धव यांचे एकत्र येणे भाजप आणि शिंदे सेनेसाठी अडचणीचे होऊ शकते. मुस्लीम, १२% गुजराती, राजस्थानी मतदार निर्णायक होऊ शकतात.
Web Summary : Mumbai's upcoming election pits Uddhav-Raj against BJP-Shinde Sena. Marathi votes in 138 wards are crucial. Alliances shift, with potential impact on power dynamics. BJP aims for maximum seats to secure mayorship. Congress and NCP face challenges.
Web Summary : मुंबई के आगामी चुनाव में उद्धव-राज बनाम बीजेपी-शिंदे सेना। 138 वार्डों में मराठी वोट महत्वपूर्ण हैं। गठबंधन बदल रहे हैं, जिसका सत्ता गतिशीलता पर संभावित प्रभाव है। बीजेपी का लक्ष्य मेयर पद सुरक्षित करने के लिए अधिकतम सीटें हासिल करना है। कांग्रेस और एनसीपी चुनौतियों का सामना कर रहे हैं।