ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १५ - उद्धव ठाकरे यांना मी युती तोडू नका असा सल्ला दिला होता, परंतु त्यांनी तो ऐकला नाही असे विधान भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी शनिवारी केले आहे. पाटणा येथे पत्रकारांशी बोलताना आडवाणी म्हणाले की भाजपा व शिवसेनेच्या निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू होत्या. त्यावेळी मी स्वत: उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि युती तोडू नका असा सल्ला दिला असे आडवाणी म्हणाले.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या एका दिवसा अगोदरपर्यंत युतीची चर्चा सुरू होती. भाजपाने गेल्या वर्षीच्या तुलनेत शिवसेनेन मित्रपक्षांसाठी जास्त जागा सोडाव्यात अशी मागणी केली होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यास साफ नकार दिला होता. चर्चेचे गु-हाळ शेवटपर्यंत चालल्यानंतर अखेर भाजपाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला आणि गेले २५ वर्षे असलेली युती तुटली. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून आधी नितिश कुमार यांचा जनता दल (सेक्यलुर) हा पक्ष रालोआमधून बाहेर पडला तर वर्षभरातच जागा वाटप फिस्कटल्यामुळे शिवसेनेने महाराष्ट्रातली युती तोडली. याप्रकरणामध्ये दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते एकमेकांना जबाबदार धरत असले तरी आडवाणी यांनी मात्र उद्धव ठाकरे यांनी आपला सल्ला न ऐकता युती तोडल्याचे म्हटले आहे.