मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्याने शिवसैनिक-मनसैनिकांमध्ये चैतन्य उसळले, तर या बंधुभेटीतून नवे राजकीय समीकरणही मांडले जाऊ लागले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची ही तर नांदी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपाची युती तुटली तेव्हा उद्धव-राज यांची चर्चा झाली होती. निवडणुकीत समझोता करण्याकरिता दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या बैठका ठरल्या होत्या. मात्र ऐनवेळी शिवसेनेच्या नेत्यांनी बैठकीस येण्याचे टाळले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या आजच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज ठाकरे दुपारी शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर पोहोचले आणि उद्धव यांच्या शेजारी बसून त्यांनी अनौपचारिक चर्चा केली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच शिवसैनिक व मनसैनिक या परिसरात जमा झाले. त्यांनी ‘बाळासाहेब अमर रहे’, ‘परत या, परत या, बाळासाहेब परत या’ अशा घोषणा दिल्या. उद्धव-राज यांच्यासोबत काही शिवसेना नेत्यांनी व ठाकरे कुटुंबियांच्या रवी जसरा यांच्यासारख्या निकटवर्तीयांनी फोटो काढून घेतले. आगामी महापालिका निवडणुकीतील युतीची ही नांदी असल्याच्या प्रतिक्रिया शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. बाळासाहेबांचे निधन झाले त्यावेळी अंत्यसंस्काराच्यावेळी राज यांना शिवसेनाप्रमुखांच्या पार्थिवाला त्यांना खांदा देऊ दिला नाही, अशी वृत्ते राज यांच्या गोटातून पसरली होती. मागील वर्षी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला राज फिरकले नव्हते. त्यामुळे शिवसेना-भाजपात दुरावा निर्माण झाल्यामुळेच हे दोन भाऊ एकत्र आल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सपत्नीक स्मृतीस्थळावर जाऊ बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
उद्धव-राज भेटीने चर्चेला उधाण!
By admin | Updated: November 18, 2014 03:09 IST