मुंबई : गेल्या काही काळात भाजपा-शिवसेना युतीत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या आरोपांचा सामना करण्यासाठी शिवसेनेची सोबत असावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री मातोश्रीवर जाऊन स्नेहभोजन घेतले. मुख्यमंत्र्यांनी ‘डिनर डिप्लोमसी’तून भाजपा व शिवसेना सोबत असल्याचा संदेश दिला आहे. अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर शिवसेना भाजपासोबत असेल, अशी ग्वाही शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे समजते. एकदिलाने काम करून राज्याचा विकास करण्यासाठी कटीबद्ध असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुंबईतील रस्ते घोटाळ्यासह विविध मुद्द्यांवरून भाजपाच्या मुंबईतील नेत्यांनी शिवसेनेवर सतत हल्ला करण्याचे धोरण अवलंबले असून थेट ‘मातोश्री’लाही लक्ष्य करण्यात आल्याने युतीत कटुता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ अधिवेशनात युतीमधील मतभेदांचा लाभ विरोधकांना मिळू नये यासाठी एकजुटीची गरज होती. त्या दृष्टीने मुख्यमंत्री फडणवीस यांची ‘मातोश्री’ भेट महत्त्वाची मानली जात आहे. (विशेष प्रतिनिधी)>सेनेची साथ महत्त्वाचीनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या झाली. यावरून विरोधी पक्षांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे काही मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकले आहेत. विरोधक त्यावरूनही आक्रमक झाल्याने फडणवीस यांना सेनेची साथ महत्त्वाची ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांचे ‘मातोश्री’वर उद्धव यांच्यासह स्नेहभोजन
By admin | Updated: July 18, 2016 05:27 IST