ऑनलाइन लोकमतसातारा, दि. 8 - सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांची बदनामी करणारी आक्षेपार्ह पोस्ट 'फेसबुक'वर टाकल्याप्रकणी औरंगाबाद येथील युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ही पोस्ट टाकल्यानंतर सातारा पोलिसांनी 'फेसबुक'शी संपर्क साधल्यानंतर कंपनीनेही तत्काळ ही पोस्ट 'डिलीट' करून टाकली.खासदार उदयनराजे भोसले यांनी काल पुण्यात 'अॅट्रॉसिटी कायदा रद्दच करा !' अशी मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील एका युवकाने उदयनराजे यांचे विडंबन करणारे चित्र तयार करून पोस्ट टाकली होती. याची माहिती कळताच राजे समर्थकांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची गुरुवारी सकाळी भेट घेऊन कारवाईची मागणी केली. तेव्हा केदार नामक युवकावर 'सायबर एक्ट'नुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. दरम्यान, 'समाजात जातीतेढ निर्माण होऊ नये म्हणून कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये,' असे आवाहन पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले आहे.|
उदयनराजेंच्या खिल्लीची पोस्ट 'फेसबुक'नं उडविली !
By admin | Updated: September 8, 2016 17:36 IST