ऑनलाइन लोकमतबीड, दि. १८ - पाटोदा येथील शासकीय वसतिगृहातून सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी रविवारी पलायन केले होते. त्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सोमवारी आढळल्या. या घटनेने खळबळ उडाली असून वसतिगृृहाच्या सुरक्षेचे धिंंडवडे निघाले आहेत.पळालेल्या दोन्ही मुली चुलतबहिणी असून त्या आता पालकांकडे आहेत. शहरातील रेणुका मंदिराजवळ अनुसूचित जाती व नवबौद्धमुलींसाठीचे वसतिगृह आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी इमारत बांधण्यात आली असून त्यात शिक्षण व निवासाची सोय आहे. तेथे पाचवी ते दहावीपर्यंतच्या दीडशे मुली आहेत. पळालेल्या दोन्ही मुली माजलगाव तालुक्यातील मांडवगणच्या रहिवाशी आहेत. त्यांचे आई - वडील श्रीगोंदा तालुक्यात मोलमजुरी करुन उदरनिर्वाह भागवतात. रविवारी दुपारी त्या दोघी शौचालयाच्या निमित्ताने गेल्या होत्या. सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून त्यांनी खिडकीची काच फोडून संरक्षक भिंतीवरुन उड्या मारुन पलायन केले. इकडे दोन विद्यार्थिंनींच्या पलायनाने अधीक्षक एस. एन. पोथे यांच्यासह कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. दोन्ही विद्यार्थिनी बसमधून कर्जतमध्ये पोहोचल्या. तेथे त्या श्रीगोंदा येथे जाणारी बस शोधत भटकत होत्या. एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्याने त्यांना पाहिले. त्यांची चौकशी केल्यावर त्या पळून आल्याचे उघड झाले. त्यांनी दोघींनाही कार्यालयात बसविले. त्यांच्याकडून पालकांचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवून त्यांना सूखरुप पालकांच्या स्वाधीन केले. त्यामुळे वसतिगृह प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला.आयुक्त, तहसीलदारांची भेटया घटनेनंतर सोमवारी समाजकल्याणचे सहायक आयुक्त आर. एम. शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे यांनी वसतिगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी अधीक्षक पोथे यांना सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याबद्दल विचारणा करुन लेखी मागितले. तरीही निष्काळजीपणाआठ महिन्यांपूर्र्वी एक मुलगी पळून गेली होती. सुरक्षा रक्षकही गायब होता. त्यामुळे सुरक्षा रक्षकावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली होती. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना नोटीसही बजावली होती. असे असतानाही दोन विद्यार्थिनींनी पलायनाचे धाडस केले. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न कायम आहे.
वसतिगृहातून पळालेल्या दोन विद्यार्थिनी कर्जतला सापडल्या
By admin | Updated: July 18, 2016 20:24 IST