ऑनलाइन लोकमत
रायसेन, दि. २ - मध्यप्रदेशमधील रायसेन येथे बस अपघातात महाराष्ट्रातील दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या अपघातात ३६ प्रवासी जखमी झाले असून दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांवर भोपाळमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सांगलीतील काही भाविक देवदर्शनासाठी उत्तरप्रदेशमधील वाराणसी येथे गेले होते. देवदर्शन आटपून हे सर्व भाविक बसने स्वगृही परतत होते. मध्यप्रदेशमधील रायसेनजवळ भाविकांच्या बसला अपघात झाला. पहाटे अडीचच्या सुमारास बस उलटली व या विचित्र अपघातात बसमधील दोघा भाविकांचा मृत्यू झाला. बसमधील सर्व प्रवासी महाराष्ट्रातील असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांवर रायसेनमधील जिल्हा रुग्णालयात तर गंभीर जखमी झालेल्यांवर भोपाळमध्ये उपार सुरु आहेत. या बसमधील बहुसंख्य प्रवासी हे ज्येष्ट महिला व पुरुष असल्याचे पोलिसांनी सांगितले.