भातसानगर : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूरातील अनेक गावे आणि पाड्यांवरील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने गेल्या सहा वर्षांत एक कोटी ९५ लाख ६२ हजार रु पये खर्च केले. मात्र तरीही या गावपाड्यांवरील पाणीटंचाई जैसे थे आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये दरवर्षी भरच पडली असल्याचे दिसून येत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर लावण्यात आले होते, त्या ठेकेदारांचे भाड्याचे पैसे द्यायला मात्र शासनाकडे निधीचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे.तालुक्यातील बहुसंख्य दुर्गम व डोंगराळ भागांतील गावपाड्यांवर तीव्र पाणीटंचाई आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने अनेक गावांत नळपाणीपुरवठ्याच्या योजना सुरू केल्या. परंतु, ढिसाळ नियोजन, निकृष्ट साहित्य आणि पाचवीला पुजलेला भ्रष्टाचार या कारणांमुळे पैसा खर्च झाला तरी योजना सुरू झाल्या नाहीत. लोकांना अद्याप नळाचे पाणी बघायला मिळालेले नाही. पाण्यासाठी ग्रामीण महिलांना आजही वणवण करावी लागत आहे. टँकरवर प्रचंड उधळपट्टी झाली आहे. या खर्चापैकी फक्त २४ लाख रु पये ठेकेदारांना देण्यात आले. उर्वरित रकमेसाठी ठेकेदार सध्या ग्रामीण पाणीपुरवठा खात्याच्या चकरा मारत आहेत. चालू वर्षी पाणीटंचाई भासू नये, म्हणून कृती आराखडा तयार करण्याचे काम चालू आहे. (प्रतिनिधी)
दोन कोटी पाण्यात
By admin | Updated: November 24, 2014 03:23 IST