बुलडाणा : धाड वनपरिक्षेत्रातील तेलीखोरे जंगलात रविवारी पहाटे दोन बिबट्याचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आले. नर-मादी असलेल्या या बिबट्यांच्या मृत्यूप्रकरणी वनविभागाने दोन संशयितांना ताब्यात घेतले असून शेती कुंपणाला लावलेल्या जिवंत वीज प्रवाहाचा धक्का बसून हे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.धाड वनपरिक्षेत्राच्या जामठी बिटमध्ये बिबट्यांचे मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने मध्यरात्रीच तेथे पाहणी केली. यात वनपरिक्षेत्रात असलेल्या गट नं. १९ मधील शेतात कुंपणाच्या तारेत विजेचा प्रवाह सोडण्यात आल्याचे आढळून आले. या विजप्रवाहाचा धक्का लागून बिबट्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर अज्ञात व्यक्तीकडून त्यांना नाल्यात जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी संशयित म्हणून जामठी येथील साहेबराव शंकर थोरात (५६) व रमेश रामा रावळकर (४३) या दोघांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. पंचनामा करून दोन्ही बिबट्यांची पशुवैद्यकीय अधिकार्यांकडून उत्तरीय तपासणी करण्यात आली. यापूर्वीही झाला होता विष प्रयोगगतवर्षी ढालसांवगी शिवारात काही लोकांनी विष प्रयोग करून दोन बिबट्यांना ठार केले होते. तीन महिन्यांपूर्वीही माळवंडी शिवारात अशीच घटना उघडकीस आली होती. त्यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.बिबट्यांचे मृतदेह अर्धवट जळण्यात आले असून, हा घातपातचाच प्रकार आहे. मुख्य संशयितांचा तपास वनविभागाकडून सुरू आहे.- जी. ए. झोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बुलडाणा.
विजेच्या धक्क्याने दोन बिबट्यांचा मृत्यू
By admin | Updated: August 1, 2016 01:24 IST