समाज कल्याण विभाग निद्रिस्त : आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा चौकशी अहवाल पूर्णगडचिरोली : शिष्यवृत्ती अफरातफर प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयाच्या चमूने या प्रकरणाची सखोल चौकशी करून अंतिम अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील सहा महाविद्यालयांनी क्षमतेपेक्षा अधिक बोगस विद्यार्थी दाखवून दोन कोटी नऊ लाख २७ हजार ३९ रूपयाची शिष्यवृत्ती लाटली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अल्प मुदतीचे तांत्रिक अभ्यासक्रमाचे शिक्षण देण्याच्या नावाखाली चारपाच वर्षांपूर्वी शिक्षण संस्थांनी आपले महाविद्यालय उघडले. कोट्यवधी रूपयाचा शिष्यवृत्ती घोटाळा करणाऱ्या संस्था व महाविद्यालयांमध्ये संकल्प सिध्दी बहुउद्देशिय विकास संस्था गडचिरोली, साईराम बहुउद्देशिय विकास संस्था सावली, शिवाजी कॉलेज वडसा, शिवनेरी कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजी गडचिरोली, गुरूसाई कॉलेज आॅफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट, विद्याभारती कॉलेज गडचिरोली, स्व. राहूलभाऊ बोम्मावार कॉलेज आॅफ मॅनेजमेंट अँड टेक्नालॉजी चामोर्शी, सावित्रीबाई फुले इन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी गडचिरोली आदींचा समावेश आहे. या सहा महाविद्यालयांनी २०१२-१३ व २०१३-१४ या सत्रात क्षमतेपेक्षा अधिक बोगस विद्यार्थी दाखवून आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागाकडून दिल्या जाणाऱ्या कोट्यवधी रूपयांच्या शिष्यवृत्तीची अफरातफर केली. या संदर्भात गडचिरोली प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी पी. शिवशंकर यांनी गडचिरोली व चामोर्शी पोलीस ठाण्यात अफरातफर करणाऱ्या संस्थाचालकांविरोधात तक्रार दाखल केली. (जिल्हा प्रतिनिधी)
दोन कोटी नऊ लाखांची शिष्यवृत्ती महाविद्यालयांनी केली फस्त
By admin | Updated: January 13, 2015 01:01 IST