शेफाली परब-पंडित, मुंबईसार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी पालिका प्र्रशासनाने कुलाबा येथील प्रसिद्ध ताजमहल हॉटेलला तब्बल दोन कोटी १३ लाख रुपये दंड ठोठावला आहे़ २००९ पासूनचा हा दंड भरण्यासाठी १५ एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे़ त्यामुळे हॉटेलच्या बाहेर बॅरिकेट्स व फुल झाडे लावणे हॉटेल व्यवस्थापनाला चांगलेच महागात पडणार आहे़ २००८मध्ये अतिरेकी हल्ल्यानंतर कुलाबा येथील या हॉटेलच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला़ मात्र सुरक्षेसाठी हॉटेल व्यवस्थापनाने सार्वजनिक रस्त्यावर फुलझाडे व बॅरिकेट्स बसविले आहेत़ या विरोधात स्थानिक रहिवाशांनी पालिकेकडे तक्रार केल्यानंतर ए विभाग कार्यालयाने गंभीर दखल घेत ताजमहल पॅलेस आणि टॉवर हॉटेलला नोटीस पाठविली होती़ या वृत्तास ए विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त सी़ चौरे यांनी दुजोरा दिला आहे़ सार्वजनिक जागेचा वापर करायचा असल्यास दरवर्षी ठरावीक रक्कम जमा करण्याची सूचना पालिकेने हॉटेल व्यवस्थापनाला केली आहे़ यामध्ये बॅरिकेट्स व फुलझाडे लावणे, वाहनं उभी करणे यासाठी एक कोटी ३२ लाख व सहा वर्षांत यावर ८० लाख रुपये व्याज असे एकूण दोन कोटी १३ लाख रुपये भरण्याची ताकीद पालिकेने दिली आहे़ मात्र अद्याप काही प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेने आता हॉटेल व्यवस्थापनाला १५ एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे़
‘ताज’ला दोन कोटींचा दंड
By admin | Updated: April 9, 2015 04:31 IST