सातारा : रस्त्याच्या बाजूच्या कळकटलेल्या वस्त्या.. पालांमधलं अठराविश्व दारिद्रय़ आणि चेह:यावर लपवता न येणारी अगतिकता.. अशा वंचित समाजातील लहानग्यांच्या चेह:यांवर स्मितरेषा उमटविण्याचा प्रयत्न सातारकरांनी ‘लोकमत’च्या खांद्याला खांदा लावून केला. सुमारे बाराशे उघडय़ा नागडय़ा मुलांना ऐन थंडीत मायेची ऊब देऊन सातारकरांनी नवा आदर्श निर्माण केला.
शहरात सुमारे एक हजार गरीब मुले ऐन थंडीत उघडय़ावर झोपतात, त्यांना पुरेसे उबदार कपडेही मिळत नाहीत, असे पाहणीत आढळून आल्यावर ‘लोकमत’ने या मुलांसाठी घरातील जुने कपडे देण्याचे आवाहन सातारकरांना 12 सप्टेंबरच्या अंकातून केले.
त्याला तातडीने आणि भरभरून प्रतिसाद देऊन सातारकरांनी संवेदनशीलतेचा प्रत्यय दिला. त्यानंतर दोनच दिवसांत म्हणजे बालदिनी, 14 नोव्हेंबरपासून ‘लोकमत’ टीम आणि या मोहिमेसाठी स्वयंस्फूर्तीने सरसावलेल्या तरुण कार्यकत्र्यानी दोन वस्त्यांमध्ये कपडय़ांचे वाटप सुरूही केले.
गोडोली येथील गोसावी आणि गोंड आदिवासींच्या वस्तीत कपडे वाटपास सुरुवात झाली. त्यानंतर महामार्गालगतच्या सहा वस्त्यांमध्ये सोमवारअखेर कपडे वाटप करण्यात आले आहे. सातारकरांनी या चिमुकल्यांसाठी तब्बल 3 हजार 5क्क् पेक्षा अधिक कपडे दिले. विशेष म्हणजे, कपडय़ांच्या काही व्यापा:यांनी नवे कपडेही दिले. (प्रतिनिधी)
बाळगोपाळांचा उत्साह
‘लोकमत’च्या मोहिमेत बालगोपाळही तितक्याच स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. अनेकांनी आपापल्या सोसायटीत घराघरो जाऊन कपडे गोळा केले आणि ‘लोकमत’ कार्यालयात आणून दिले. झोपडीतल्या मुलांना आपल्यासारखाच खाऊ मिळावा, म्हणून काही मुलांनी बिस्कीटाचे पुडे आणून दिले.
सुमारे तीनशे नवे स्वेटर आणि ज्ॉकटे ‘लोकमत’कडे जमा झाले. महिलांनी साडय़ा आणि काही जणांनी बूटही दिले. त्यामुळे महामार्गालगतच्या सहा वस्त्या, ‘प्रांजली’समोरील वस्ती, म्हसवे रस्त्यावरील कातकरी वस्ती अशा आठ झोपडपट्टय़ांमधील मुलांना ऊबदार कपडे मिळाले.
ट्रॉली भरून कपडे
‘लोकमत’च्या मोहिमेला मिळालेला सातारकरांचा प्रतिसाद इतका अभूतपूर्व होता, की महामार्गावरील वस्त्यांमध्ये ट्रॉलीतून कपडे न्यावे लागले. मोहिमेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. कपडे देण्यासाठी महिलांचे शेकडो फोन रोज येत होते. कपडे गोळा करण्यासाठी एका व्यक्तीने तीन चाकी टेम्पो विनामूल्य दिला होता.