मुंबई : गर्दीत घामाघूम अवस्थेत आणि घामाचा कुबट वास घेत प्रवास करण्याच्या यातनांतून प्रवाशांची येत्या मे महिन्यात काही प्रमाणात सुटका होणार आहे. प्रवाशांच्या दिमतीला एक नाही, दोन नाही तर तब्बल १२ एसी लोकल येणार आहेत. त्यापैकी पहिली एसी लोकल येत्या तीन ते चार महिन्यांत दाखल होणार असल्याचे एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) सांगण्यात आले. रेल्वे बोर्डाने १२ एसी लोकल बनविण्याचे काम चेन्नईतील रेल्वेच्या आयसीएफला (इंटिग्रल कोच फॅक्टरी) दिले असल्याचे एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बम्बार्डियर कंपनीच्या दोन लोकलही मुंबईत दाखल झाल्या आहेत. या लोकलची चाचणी झाली असून, काही तांत्रिक बदल केले जात आहेत. या दोन्ही लोकलही पश्चिम रेल्वेमार्गावर धावणार असल्या तरी त्या नक्की कधी धावणार, याबाबत सहाय यांनी सांगितले, की त्यावर अजून काम सुरू आहे. तरीही २६ जानेवारी हा मुहूर्त योग्य असल्याचे सांगत थेट उत्तर देणे टाळले. डॉकयार्डपासून बॅलार्ड पीयरपर्यंतचा हार्बरचा विस्तार राज्य सरकारडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहितीही सहाय यांनी दिली.
बारा एसी लोकल धावणार
By admin | Updated: January 13, 2015 05:36 IST