तुळजापूर (उस्मानाबाद) : कुंकवाची उधळण करीत, आपट्याची पाने वाटून संबळाच्या वाद्यात आणि आई राजा उदो ऽऽ उदो ऽऽऽ च्या जयघोषात मंगळवारी पहाटे श्री तुळजाभवानी देवीचा सीमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी हजारो भाविक सहभागी झाले होते. त्यानंतर देवीच्या पाचदिवसीय श्रमनिद्रेस प्रारंभ झाला.तत्पूर्वी रात्री बारा वाजता अभिषेक पूजेसाठी घाट झाली व पंचामृत अभिषेकास प्रारंभ झाला. त्यानंतर रात्री दोन वाजता भोपे पुजारी व महंतांनी देवीस १०८ साड्यांचा दिंड बांधला. दरम्यान, नगरहून आलेल्या पलंग व पालखीचे स्वागत मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले. शहरातील किसान चौक, आर्य चौक, महाद्वार चौक मार्गे पलंग व पालखी मंदिरात वाजत-गाजत दाखल झाल्यानंतर देवीची आरती, धुपारती व धार्मिक विधी पार पडले. यानंतर भोपे पुजाऱ्यांनी देवीची मूर्ती नगरहून आलेल्या पालखीत ठेवून ‘आई राजा उदो उदो’ च्या जयघोषात मंदिर प्रदक्षिणा पार पडली. पिंपळपारावर पालखीस विसाव्यास ठेवण्यात आले. यावेळी मानाच्या आरत्या, नैवेद्य आदी विधी होवून देवीस आपट्याची पाने वाहण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी कुंकवाची उधळण करीत देवीचा जयघोष केला. या सीमोल्लंघनानंतर देवीमूर्तीस पालखीतून सिंहगाभाऱ्यातील नवीन पलंगावर श्रमनिद्रेसाठी ठेवण्यात आले. यानंतर शासकीय आरती व भोप्यांची आरती झालीली. यापुढील पाच दिवस देवीची श्रमनिद्रा सुरू राहणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, तसीलदार सुजीत नरहरे, दिलीप नाईकवाडी यांनी आरती करणाऱ्यांना श्रीफळ प्रसाद दिला़ तसेच पलंग पालखीतील पलंगे व भगत यांनाही भरपेहराव आहेर देण्यात आल्यानंतर सीमोल्लंघनाची सांगता झाली. (वार्ताहर)
‘आई राजा’च्या जयघोषात तुळजाभवानीचे सीमोल्लंघन
By admin | Updated: October 12, 2016 06:31 IST