मुंबई : ड्रगमाफिया शशिकला ऊर्फ बेबी पाटणकरसाठी आरोपी पोलिसांनी पोलिसांनाच लाच देण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे गुन्हे शाखेकडून माणिकपूर पोलिसांचेही जबाब नोंद होण्याची शक्यता आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमडी हा घातक अमली पदार्थ एनडीपीएस कायद्याच्या कक्षेत नव्हता, तेव्हा पोलीस भारतीय दंड विधानातील कलम ३२८अन्वये गुन्हा दाखल करीत होते. अशाच एका प्रकरणात माणिकपूर पोलिसांनी काही आरोपींना एमडीच्या साठ्यासह अटक केली होती. चौकशीत त्यांनी हा पदार्थ बेबीकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार माणिकपूर पोलिसांनी बेबीचा शोध सुरू केला. ही कुणकुण लागताच अटक आरोपी यशवंत पार्टे व सुधाकर सारंग या दोघांनी तत्काळ माणिकपूर पोलीस ठाणे गाठले. तेथील अधिकाऱ्यांना या गुन्ह्यातून बेबीचे नाव काढून टाकण्याची मागणी केली आणि दोघांनी त्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे माणिकपूर पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यातून हाकलून लावले होते.ही माहिती पुढे आल्याने पार्टे व सारंग बेबीला वाचविण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करीत होते, हे स्पष्ट होणार आहे. त्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी माणिकपूर पोलिसांचे जबाब नोंदवून घेऊ शकतात, असेही गुन्हे शाखेतल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
बेबीसाठी पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्न
By admin | Updated: June 3, 2015 03:36 IST