कळंबोली : नवीन पनवेल येथील एचडीएफसी ते आदई सर्कलदरम्यान सिडकोने सुरुवातीला झाडे लावून वनराई निर्माण केली होती. या दुतर्फा असलेल्या झाडांमुळे एक वेगळे सौंदर्य माथेरान रस्त्याला आले होते. परंतु गेल्या एक वर्षात ही सर्व झाडे अचानक सुकून गेली आहेत. त्यांची पानगळ झाली आहे, त्याचबरोबर हिरवाई नष्ट झाली आहे. कोणीतरी हेतुपुरस्सर केमिकल देऊन झाडे मारली असल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात केरलीया कल्चरल सोसाटी, पनवेल यांनी सिडकोला पत्र देऊन तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे.नवीन पनवेल येथून माथेरान रस्ता जातो. या रस्त्यावर बँका, शोरूम्स, बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये असल्याने या रस्त्याला दलाल स्ट्रीटचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने वाहन आणि नागरिकांची वर्दळ पाहावयास मिळते. त्याचबरोबर या मार्गावरून नेरे आणि त्या परिसरातील गावांना ये-जा होत असते. एकंदरीत अतिशय महत्त्वाचा आणि नवीन पनवेलची खास ओळख असणाऱ्या माथेरान रस्त्याला सिडकोने पूर्वी दोन्ही बाजूने शोभेची झाडे लावली होती. या झाडांमुळे आजूबाजूच्या परिसराला गारवा तर मिळतच होता, त्याचबरोबर प्राणवायूचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत होता. याव्यतिरिक्त हिरवाई नवीन पनवेलकरांना साद घालीत असे. त्याचबरोबर उन्हाळ्यात गारवा देणारे वृक्ष म्हणून या झाडांना ओळखले जायचे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ही झाडे अचानक सुकू लागली आहेत. या पाठीमागचे नेमके कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. दोन्ही बाजूस व्यापारी संकुले असल्याने त्यामधील दुकानदारांनी समोरील झाडांची परस्पर तोड केल्याचा आरोप केरलीया कल्चर सोसायटीने केला आहे. या ठिकाणी असलेली झाडे अचानक एकाच वेळी कशी सुकली, याबाबत वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. या मृत होत असलेल्या जागी नवीन झाडांची लागवड करावी, अशी मागणी केरलीया सोसायटीने केली आहे. त्याचबरोबर माथेरान रस्त्यावरील या झाडांचे पुनर्जीवन होईल का, याबाबत अगोदर चाचपणी करावी, अशी मागणीही आम्ही केली असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष मनोजकुमार एम. एस. यांनी सांगितले. (वार्ताहर)माथेरान रस्त्यावरील झाडे का सुकली, याबाबत थेट कारण आता तरी सांगता येणार नाही. त्याबाबत आम्ही शहानिशा करू, त्यावेळीच बोलणे उचित ठरेल. पावसाळ्यात झाडांच्या फांद्या तुटून कोणतीही दुर्घटना होऊ नये, याकरिता छाटणी सुरू केली आहे.- सुधाकर विसाळे, प्रशासकीय अधिकारी, सिडको
माथेरान रोडवरील झाडे सुकली
By admin | Updated: May 30, 2016 02:20 IST