डहाणू : तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सर्वत्र तुफान पर्जन्यवृष्टी होत असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी पावसाचा जोर वाढल्याने पुराचे पाणी अनेकांच्या घरात शिरले होते. तर काहींच्या वस्तूही पूरात वाहून गेल्या होत्या. विजेचा पत्ता नव्हता. डहाणू चिंचणी वरच्या वरोर पुलावरुन पाणी वाहत होते. तर वाणगाव चिंचणी रस्त्यावरील कालोवली येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद पडली होती.वाढवणच्या गावतलावाला भगदाड पडल्याने पाण्याचा पूर टीघरेपाडा गावात शिरल्याने आणि भरतीची वेळ असल्याने पाण्याचा निचरा न होऊन ते अनेकांच्या घरात पाणी घुसले. भाताचे काणगे भिजले. काही वस्तूही वाहून गेल्याने अनेकांचे नुकसान झाले. टीघरेपाडा येथील रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे बस वाहतूक देखील बंद झाली होती. शाळा, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी अडकून राहिले होते. त्यामुळे शाळा लवकर सोडण्यात आल्या नोकरी धंद्याला जाणारे चाकरमानी देखील वाहनाअभावी अडकून पडल्याने कामावर जाऊ शकले नाहीत. चिंचणी तारापूरकडे जाणाऱ्या सागरी महामार्गावरील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने त्याचे खूप मोठे नुकसान झाले. तसेच धोबी तलाव येथेही रस्त्यावर पाणी आले होते.गेल्या ४२ तासांपासून सतत पाऊस पडत आहे. डहाणूत गेल्या २४ तासांत सकाळी आठ वाजेपर्यंत १५३.३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर आतापर्यंत पाऊस तब्बल १७६८.६ इतका झाला आहे. या पावसामुळे नदी, नाले, गावतलाव तुंडुब भरले असून साखरा धरण, कावडास बंधारा ओसंडून वाहत आहे. तर धामणी धरण देखील पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. (वार्ताहर)
डहाणूत जनजीवन विस्कळीत
By admin | Updated: July 31, 2016 03:04 IST