मुंबई : एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यावर काहीवेळा त्याचे नातेवाईक डॉक्टर अथवा रुग्णालयाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करतात. यानंतर पोलीस चौकशी सुरु होते. या तक्रारींमध्ये दुसऱ्या डॉक्टरांचे मत घेतले जाते. पण, मत देणाऱ्या डॉक्टरलाच अनेकदा या प्रकरणांचा त्रास होतो. त्यामुळे या प्रकरणासंदर्भात कशाप्रकारे चौकशी करावी, याचे प्रशिक्षण पोलिसांना देण्याची गरज असल्याचा सूर ‘लॉमेडिकॉन २०१५’ या परिषदेत उमटला होता. वैद्यकीय निष्काळजीपणाच्या तक्रारीत दुसऱ्या डॉक्टरचे मत घेताना त्याला केसपेपर दाखवला जातो. पण, अनेकदा केसपेपरच अपूर्ण भरलेला असतो. यामुळे मत देताना डॉक्टरांना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. यावेळी ज्येष्ठ डॉक्टर मत देतात. पण, मिळणाऱ्या वागणुकीमुळे ज्येष्ठ डॉक्टर आता मत देण्यास सहजासहजी तयार होत नाहीत, असे जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. डॉक्टरांकडून वर्षाला १८० हून अधिक तक्रारींवर मते दिली जातात. यावेळी डॉक्टरांना पोलीस ठाण्यात बोलावले जाते. त्यांनी दिलेल्या मतांवर पोलीस त्यांना प्रश्न विचारतात. वैद्यकशास्त्र हे एक विज्ञान आहे कायदा नाही. आणि डॉक्टर जज नाहीत. यामुळे पोलीस अनेकदा डॉक्टरांना हो की नाही, हे असेच प्रश्न विचारतात, जे अनेकदा गैरलागू ठरते. पोलिसांना वैद्यकीय क्षेत्रातील अडचणी टाळण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. लहाने म्हणाले.
वैद्यकीय केसेससाठी पोलिसांना प्रशिक्षण द्या
By admin | Updated: April 6, 2015 03:27 IST