शिरोशी : माळशेज घाटामध्ये छत्री पॉइंटच्या वरच्या बाजूला अर्धा किमी अंतरावर दरडी कोसळल्याने रात्री २ वाजेपासून महामार्ग बंदच होता. यामुळे रात्रीपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जेसीबीच्या साहाय्याने त्या काढण्याचे काम दुपारी मंगळवारी १ वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर वाहतूक संथ गतीने सुरू करण्यात आली.दरम्यान, पोलिसांनी मुरबाडवरून सकाळपासून एकही वाहन माळशेज घाट परिसरात जाऊ दिले नाही. तसेच कर्जतमार्गे खंडाळा आणि शहापूर मार्गे कसारा-नाशिक अशी वाहतूक वळविली होती. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून वाहतूक पूर्वपदावर येत असल्याचे पोलीस अधिकारी विजय धुमाळ व तहसीलदार विजय तळेकर यांनी सांगितले.याआधी गणेश ट्रॅव्हलच्या बसवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांना प्राण गमवावा लागला होता. या घटनेला एक आठवडाही पूर्ण होत नाही तोच त्याच जागेवर पुन्हा दरड कोसळल्याने माळशेज घाटातील सुरक्षा रामभरोसे झाल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)
दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
By admin | Updated: June 24, 2015 01:36 IST