महाबळेश्वर : ग्राहकाकडून एक रूपया घेतला तर ९५ पैशांचे नव्हे त्यांना एक रुपयाचे सोने द्या. आपला सर्व व्यवहार एक नंबरमध्ये करा. अनोळखी व्यक्तीकडून सोने घेऊ नका. केवळ पैशासाठी व्यवसाय न करता इज्जत कमावण्यासाठी व्यवसाय करा, असा सल्ला सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी व्यावसायिकांना दिला. येथील एका हॉटेलमध्ये बुधवारी झालेल्या सराफ असोसिएशनच्या अधिवेशनात ते बोलत होते. मेळाव्यास असोसिएशनचे उपाध्यक्ष पे्रम झांबड, मुंबई संघटनेचे उपाध्यक्ष मुकेश संघवी, सांगली जिल्हा उपाध्यक्ष किशोर पंडित, सुभाष ओसवाल, सुधाकर टाक उपस्थित होते. रांका म्हणाले, ‘काही मोठे ब्रॅण्ड आपल्या दागिन्यांवर हॉलमार्कचा शिक्का मारत नाहीत. मग ही सक्ती लहान व्यापाऱ्यांवरच का केली जाते? जगात फक्त १९ देशांतच हॉलमार्क शिक्का सक्तीचा आहे. आपल्याकडे अपुऱ्या यंत्रणेमुळे अडचणी येतात. हॉलमार्कसाठी दागिने घेऊन जाताना दरोडे पडतात. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तरीही शासनाचे डोळे उघडत नाहीत. आमची इमेज, गुडविल आणि स्टेटस हाच आमचा हॉलमार्क आहे. एक मिलीग्रॅम वजनी काटा सक्तीचा करणारा कायदा रद्द होणार असल्याचे रांका यांनी सांगितले. यावेळी राज्यभरातून सुवर्णकार बंधुंनी उपस्थिती लावली होती. (प्रतिनिधी) सोने खरेदीसाठी पॅनकार्ड सक्तीचे नको एक लाखापेक्षा जास्त रकमेचे सोने खरेदी करण्यासाठी पॅनकार्ड सक्तीचे केले आहे. ही सक्ती उठविली पाहिजे. एकीकडे सोने आयातीमुळे विदेशी चलन गुंतून पडते अशी ओरड केंद्र शासन करत आहे तर दुसरीकडे अशोकचक्र असलेले नाणे विक्रीसाठी शासनाच सोन्याची आयात करत आहे. तेव्हा विदेशी गुंतवणूक अडकून पडत नाही का, असा सवाल मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. अडचणी सोडविण्यासाठी एकत्र या व्यवसाय करताना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व सुवर्णकारांनी एकत्र येणे गरजेचे आहे. दुकानात येणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर लक्ष ठेवावे, असे मत सुधाकर टाक यांनी व्यक्त केले. यावेळी सराफांनी आपल्या व्यवसायात येणाऱ्या विविध अडचणींबाबत मते मांडली. सावकारीपेक्षा नॉनबँकिंग फायनान्स करा सावकारी करण्यापेक्षा तुम्ही सर्वजण एकत्र येऊन नॉन बँकिंग फायनान्सचा उपयोग करावा. कारण सावकारीमध्ये शासनाचे जाचक निर्बंध आहेत. उलट सावकारापेक्षा जास्त लाभ घेणारी फायनान्स कंपनीत सरकारचे नियंत्रण नाही, असे रांका यांनी स्पष्ट केले.
इज्जतीसाठी सराफांनी व्यवसाय करावा : रांका
By admin | Updated: March 26, 2015 00:06 IST