अकरावी द्विलक्षी प्रवेश : पहिल्या दिवशी ७०० प्रवेशनागपूर : कें द्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून होणाऱ्या अकरावी प्रवेश फेरीला गुरुवारपासून प्रारंभ झाला. प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी द्विलक्षी अभ्यासक्रमात प्रवेशासाठीच्या पहिल्या फेरीतील जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. शिवाजी विज्ञान महाविद्यालय व डॉ.आंबेडकर महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गातील सर्वच जागा पहिल्याच दिवशी ‘फुल्ल’ झाल्याने, अनेक विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले आहे. शहरातील द्विलक्षी अभ्यासक्रमांच्या जागांसाठी आज प्रवेशाचा पहिला दिवस होता. त्यात पहिल्या दिवशी ७०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. यापैकी ६५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या सहा विद्याशाखांपैकी ‘इलेक्ट्रॉनिक्स’ हा विषय सर्वाधिक पसंतीचा ठरला. ४२१ विद्यार्थ्यांनी यात प्रवेश घेतला. यापाठोपाठ फिशरीजच्या ११९ , कॉम्प्युटर सायन्सच्या १०२ , इलेक्ट्रिकल मेंटेनन्सची एक व मेकॅ निकल मेंटेनन्सच्या अभ्यासक्रमात दोन विद्यार्थ्यांंनी प्रवेश घेतला. नामांकित महाविद्यालयांसाठी चुरसनागपुरात द्विलक्षी अभ्यासक्रमाची ७५ कनिष्ठ महाविद्यालये असून, यात शिवाजी सायन्स कॉलेज, डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी यासारख्या नामांकित संस्थांचा समावेश आहे. या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले. प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी शिवाजी विज्ञान महाविद्यालय व डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील बहुतांश सर्व जागा भरल्याचे सांगण्यात आले. आंबेडकर महाविद्यालयात संगणक विज्ञानच्या खुल्या प्रवर्गातील प्रवेश ९८ टक्क्यांवर बंद झाले. इलेक्ट्रॉनिक्समध्ये हाच आकडा ९६.६ टक्के तर फिशरीजमध्ये ९६.२ टक्के इतका आहे. अकरावी प्रवेशाचा आज पहिला दिवस असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. ९५ टक्के मिळवूनही प्रवेश नाहीधनवटे नॅशनल महाविद्यालयात सुरू असलेल्या ‘स्पॉट अॅडमिशन’साठी विद्यार्थ्यांसोबत पालकांनीदेखील गर्दी केली होती. गुणांची स्पर्धा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की, ९५ टक्के गुण मिळवूनदेखील नामांकित महाविद्यालयांत प्रवेश न मिळाल्याने काही विद्यार्थी निराश झाले होते. पसंतीचे महाविद्यालय न मिळाल्याने त्यांना दुसऱ्या ठिकाणी प्रवेश घेण्याची तडजोड करावी लागली.
टॉप कॉलेजेसच्या जागा ‘फुल्ल’
By admin | Updated: July 4, 2014 01:21 IST