अनंत जाधव - सावंतवाडी -गोवा सरकारने मोठा गाजावाजा करत गोवा राज्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरच टोल वसुली सुरू केली होती. ती टोल वसुली आता लवकरच बंद करण्यात येणार असल्याची माहिती गोव्यातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. याला गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत सावंतवाडीत आले असता दुजोराही दिला आहे. गोव्याच्या विधानसभा अधिवेशनात हा निर्णय होणार आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील अनेक पर्यटक टोल दिल्याशिवाय गोव्यात प्रवेश करु शकणार आहेत.गोव्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी गोव्याची वित्तीय तूट भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या होत्या. त्यात गोव्याच्या प्रवेशद्वारांवर चारचाकी वाहनांना टोल आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्रातून गोव्याकडे जाताना धारगळ येथे टोलनाका उभारला होता. तर कारवार तसेच अन्य भागातून येण्यासाठी काणकोणनजीक टोलनाका उभारण्यात आला होता. या टोलमधून सिंधुदुर्गला वगळण्यात आले होते. असे असले तरी उर्वरित महाराष्ट्रातील पर्यटकांना गोव्यात पर्यटनासाठी जाताना हा मोठा भुर्दंड सहन करावा लागत होता. तसेच सिंधुदुर्गवासियांकडील बाहेरच्या पासिंगच्या गाड्या असणाऱ्यांनाही टोल भरुनच गोव्यात जावे लागत असे. त्यातच गोव्याला जाणारे कंटेनर तसेच अन्य गाड्या यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात हा दंड वसूल करण्यात येत होता. याची कारणेही अनेक होती. टोलवरून गोवा सरकार सर्वांच्या टीकेचे धनी झाले होते. मात्र, तरीही हा टोल सुरू ठेवण्यात आला होता.मात्र, आता केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर गोव्यातील भाजप सरकारला ऊर्जितावस्था आली आहे. अनेक मायनिंगसारखे उद्योग पुन्हा सुरू होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गोवा सरकारला झालेली वित्तीय तूट येत्या काळात तरी भरून निघेल, अशी आशा वाटल्याने आता टोलनाके बंद करण्याचा धाडसी निर्णय घेण्याच्या विचारात गोवा सरकार आहे.याला गोव्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. तर मध्यंतरी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सावंतवाडीत आले असता त्यांनीही टोल नाके बंद करण्याच्या विचारात गोवा सरकार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच येत्या अधिवेशनात याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचेही सांगितले होते. त्यामुळे हे टोल नाके बंद झाले तर अनेकांना गोव्यात पुन्हा पूर्वीसारखेच टोल भरणा केल्याशिवाय जाता येणार आहे आणि यामुळे याचा जास्त फायदा हा महाराष्ट्रातील वाहनांना होणार आहे.
गोवा प्रवेशद्वारावरील टोलनाके बंद होणार
By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST