कल्याण : शाळा-महाविद्यालये लवकरच सुरू होत असल्याने केडीएमटी उपक्रमातील चालक आणि वाहकांना तातडीने पगार देण्यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’च्या ‘ठाणे हॅलो’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल केडीएमटी व्यवस्थापनाने घेतली आहे. वेतनाचे धनादेश संबंधित बँकेत जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्रवारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनाची रक्कम वर्ग होईल. दरम्यान, याबाबत परिवहन कामगार कर्मचारी संघटनांनी ‘लोकमत’चे विशेष आभार मानले. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी परिवहन उपक्रमाला केडीएमसीकडून दरमहिन्याला एक कोटीचे अनुदान मिळते. ते दरमहिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळावे, अशी मागणी सातत्याने परिवहन सदस्य आणि कर्मचारी संघटना करत आहेत. याअनुषंगाने परिवहन समितीच्या बैठकीत ठरावही करण्यात आले आहेत. परंतु, केडीएमसीकडून अनुदानाला विलंब होत असल्याने परिवहन कर्मचाऱ्यांना दरमहिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वेतन मिळते. एप्रिलचे वेतनही २४ मे रोजी कर्मचाऱ्यांच्या हाती पडले होते. दरम्यान, परिवहनचे शिवसेनेचे सदस्य दत्तकुमार खंडागळे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांच्यासह महापालिकेच्या लेखा विभागाकडे पत्रव्यवहार करत एक कोटीचे अनुदान वर्ग करण्याची मागणी केली होती. यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. जूनमध्ये शाळा-महाविद्यालये सुरू होत आहेत. मुलांचे गणवेश, पुस्तके, शाळेची फी इत्यादी खर्चासाठी परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांचे वेतन जूनच्या पहिल्या आठवड्यासाठी अदा करावे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भासणार नसल्याकडे परिवहन सदस्य खंडागळे यांनी लक्ष वेधले होते. त्यावर, परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनीही जूनमध्ये १० जून ते १५ जूनदरम्यान शाळा, महाविद्यालये सुरू होत असल्याने ७ जूनपर्यंत वेतन अदा करणे आवश्यक असल्याचे पत्र शुक्रवारी महापालिका प्रशासनाला पाठवले होते. त्यावर, ५० लाखांचे अनुदान केडीएमसीकडून उपक्रमाला मिळाले होते. दरम्यान, याप्रकरणी परिवहन कर्मचारी कामगार संघटनेचे पदाधिकारी शरद जाधव यांनी केडीएमटीचे सदस्य खंडागळे यांच्यासह लोकमतचे आभार मानले आहे. (प्रतिनिधी)केडीएमटी उपक्रमाने गुरुवारी वेतनाचे धनादेश बँकेत जमा केले आहेत. त्यामुळे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळेल.- सुधाकर आठवले, लेखाधिकारी, कल्याण-डोंबिवली महापालिका.
केडीएमटी कर्मचाऱ्यांना आज वेतन
By admin | Updated: June 10, 2016 03:18 IST