मुंबई: अभिनेता सलमान खानविरोधातील बहुचर्चित व प्रलंबित हिट अॅण्ड रन खटला आता अंतिम टप्प्यात आला आहे. उद्या, बुधवारपासून सरकारी पक्षाचा याप्रकरणी युक्तिवाद सुरू होणार आहे. तो मी नव्हेच, असे सांगून सर्व आरोप फेटाळल्यानंतर सलमानने हा दावा सिद्ध करण्यासाठी स्वत:चाच ड्रायव्हर अशोक सिंग याची साक्ष नोंदवली. त्यानेही सल्लूभाई या घटनेसाठी दोषी नसल्याने सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांच्यासमोर सांगितले. मात्र सिंग नंतर इतर कोणाचीही साक्ष नोंदवली जाणार नसल्याचे सलमानचे वकिल श्रीकांत शिवदे यांनी न्यायालयात स्पष्ट केले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने उभय पक्षांचा युक्तिवाद सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारपासून विशेष सरकारी वकील प्रदीप घरत युक्तिवाद करतील. त्यांचा युक्तिवाद आठवडाभर तरी चालेल. त्यानंतर अॅड. शिवदे आपली बाजू मांडतील.वांद्रे येथे झालेल्या या घटनेत सलमानने भरधाव गाडी चालवत चौघांना चिरडले व त्यात एकाचा बळी गेला असा पोलिसांचा आरोप आहे. यात दोषी आढळल्यास सलमानला दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. (प्रतिनिधी)
हिट अॅँड रन प्रकरणी युक्तिवाद आजपासून
By admin | Updated: April 1, 2015 02:26 IST