बाळासाहेब बोचरे, बरड (जि. सातारा)आषाढी वारी कधी येईल आणि सावळ्या विठुरायाला कधी भेटेन या उत्कट ओढीने गेले १२ दिवस ऊन-वाऱ्याची तमा न बाळगता अखंड हरिनामाचा जयघोष करीत संत ज्ञानेश्वर माऊलींसोबत लाखो वैष्णवांची मांदियाळी सोमवारी सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड मुक्कामी आली. आता मंगळवारी सकाळी १०.३०च्या सुमारास धर्मपुरी येथे हा सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.आळंदीहून निघाल्यापासून पावसाचा एकही थेंब अंगावर न पडलेले वारकरी दररोज धुळीत माखून निघत आहेत. दमा, खोकला, सर्दी, गुडघेदुखी, पोटदुखी असे आजार धुळीमुळे बळावत असले तरी त्याची तमा न बाळगता वाटचाल सुरू आहे. वरुणराजा आपल्यावर रुसला की काय, एवढीच चिंता त्यांना आहे. सर्वात पुढे मावडीकरांचा चौघडा, त्यामागे २७ नंबरची दिंडी, त्यामागे शितोळे सरकारांचे मानाचे अश्व, त्यानंतर २६ दिंड्या, त्यामागे चांदीच्या रथामध्ये विराजमान माऊलींची पालखी आणि मागे ४५० दिंड्या असा हा वैभवी लवाजमा गेले १२ दिवस वाटचाल करीत आहे.सकाळी ऐतिहासिक फलटण नगरीला निरोप देऊन पालखीने पुढची वाटचाल सुरू केली.
माऊलींचा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश
By admin | Updated: July 21, 2015 01:14 IST