पुणे : आजपर्यंत आयुर्वेदाकडे दुर्लक्ष केले गेले; परंतु लोकांच्या प्रयत्नांमुळे आयुर्वेदाचे नाव जगभर झाले आहे. आयुर्वेद उपचार पद्धती पुढे घेऊन जाण्याची आणि सर्व मानवाच्या कल्याणसाठी ऋषीमुनींची ही देणगी संपूर्ण जगाला देण्याची वेळ आली आहे, असे मत आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.असोसिएशन आॅफ मॅनेजमेंट आॅफ आयुर्वेदिक कॉलेज आॅफ महाराष्ट्रतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नाईक यांच्या हस्ते आयुर्वेद क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले यांना ‘आयुर्वेद भूषण’ आणि वैद्य डॉ. सदानंद सरदेशमुख यांना ‘आयुर्वेद रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब आहेर, सचिव निशिकांत पाटील, खजिनदार किशोर सराफ, राज्याचे समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, राहुल आहेर, खासदार भावना गवळी, भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. वनिता मुरलीकुमार, उपाध्यक्ष डॉ. अमिताभकुमार पांडे आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले, राज्यातील अनेक महाविद्यालयांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जात आहे. राज्यात नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेद स्थापन करण्याचा आणि आयुर्वेदच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विद्यार्थी वेतन देण्याच्या असोसिएशनच्या मागणीचा आम्ही विचार करू आणि त्या पूर्णत्वास नेऊ.डॉ. मुरलीकुमार म्हणाल्या, केरळपेक्षा महाराष्ट्राचे योगदान आयुर्वेद क्षेत्रात मोठे आहे. आयुर्वेदासारखी चांगली गोष्ट आपल्याला लोकांपुढे आणायची आहे.पुरस्कार स्वीकारल्यानंतर वैद्य डॉ. सरदेशमुख म्हणाले, केंद्र सरकारमध्ये आयुषकरिता स्वतंत्र मंत्री असल्यामुळे आता आयुर्वेद क्षेत्राला फायदा होईल. आयुष मंत्रालयाने धोरणे व योजना आखताना परदेशी लोकांचाही विचार करावा.वैद्य खडीवाले म्हणाले, आधुनिक चिकित्सकांप्रमाणे आयुर्वेद क्षेत्रातील लोकांनाही सन्मान मिळवून देण्याची गरज आहे. सरकारने गावोगावी औषधी बगीचे तयार करण्याची योजना राबवावी. (प्रतिनिधी)