अशोक खरात,
खोडद- युरोपने मंगळावर सोडलेल्या यानाच्या हालचालींचे सिग्नल नेमके टिपून अंतरिक्षातील गूढ उकलण्यामध्ये खोडदच्या महादुर्बिणीने कामगिरी बजावली आहे. या आंतरराष्ट्रीय मोहिमेतील महत्त्वपूर्ण सहभागामुळे जीएमआरटी आणि पुणे जिल्हा यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले आहे. एक्सोमार्स हे यान युरोपने १४ मार्च २०१६ रोजी सोडले होते. जागतिक दर्जाच्या जीएमआरटीद्वारे या यानात काही तांत्रिक बिघाड होतो की काय किंवा हे यान सुखरूप मंगळावर पोहोचते की नाही, याची पाहणी करण्यास सूक्ष्म लहरींद्वारे बुधवारी सायंकाळी साडेसातपासून सुरुवात झाली. पुढील २२ मिनिटांच्या कालावधीत यानाशी जीएमआरटीला संपर्क साधून निरीक्षण करता आले. नासाचे शास्त्रज्ञ स्टीफन इस्टरहुईझेन, जीएमआरटी प्रकल्पाचे निर्देशक प्रो. स्वर्णकांती घोष व अधिष्ठाता प्रो. यशवंत गुप्ता यांनी ही महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. जीएमआरटी प्रकल्पाची १५० ते १६५० मेगाहटर््झ अशी फ्रिक्वेन्सी आहे, तर मंगळावरील या यानाशी ४०१ मेगाहटर््झवर जीएमआरटीद्वारे संवाद साधला गेला आहे. या प्रकल्पातील ३० डिश अँटेनांपैकी सेंट्रल स्क्वेअरमधील १४ डिश अँटेना मंगळाच्या दिशेने फिरविण्यात आल्या होत्या, असे जीएमआरटीचे प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे यांनी सांगितले. रशियन आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या वतीने १४ मार्च २०१६ रोजी एक्सोमार्स नावाचे यान मंगळावर सोडले होते. हे यान मंगळावर उतरताना त्याला काही अडचणी येतात का किंवा हे यान मंगळावर उतरताना काही दुर्घटना होते का, याचे सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी खोडद येथील प्रकल्पाची निवड केली होती.