गणेश वासनिक, अमरावतीदेशभरात व्याघ्रगणना करून सहा महिन्यांचा कालावधी लोटला असताना वाघांची संख्या निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे देशात वाघ नेमके किती, हे अद्याप गुलदस्त्यात आहेत.देशात एकूण ३९ व्याघ्र प्रकल्प आहेत. एकाच दिवशी म्हणजे १४ मे २०१४ रोजी या प्रकल्पांतील वाघांची गणना करण्यात आली. काही सुधारणा करून अद्ययावत प्रणालीने वाघांची संख्या मोजण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. वाघांच्या पायांचे ठसे, कॅमेरा ट्रॅप, मायक्रोचिप, वन्यप्रणांचे अवशेष आदींची माहिती अहवाल स्वरुपात सर्वच व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्र संचालकांनी डेहरादून येथील वन्यजीव संस्थेला पाठविली आहे.आॅक्टोबर अखेरपर्यंत व्याघ्रगणनेचा अहवाल प्राप्त होणे आवश्यक होते. मात्र, सहा महिने लोटले असताना वाघांच्या संख्येबाबतचा अहवाल वन्यजीव संस्थेने केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडे सादर केला नसल्याची माहिती आहे. परिणामी देशभरात वाघांच्या संख्येत वाढ झाली का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.मागील व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार देशात १७०० पेक्षा अधिक वाघ असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु त्यानंतर वाघांच्या संख्यावाढीसाठी केंद्राने शासनाने मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली. त्यानुसार व्याघ्र प्रकल्पांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपाययोजना केल्यात. परिणामी वाघांची संख्या दुप्पट झाल्याचा दावा प्रकल्पांतील अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, कोणत्या राज्यात वाघांची संख्या किती वाढली, हे स्पष्ट झालेले नाही.
गणनेनंतरही वाघांचा अहवाल गुलदस्त्यात?
By admin | Updated: November 17, 2014 03:37 IST