मुंबई : पुनर्नियुक्ती न करता थेट कामावरून काढल्याने घाटकोपरमध्ये होमगार्डचे तीनशे कर्मचारी शुक्रवारी रस्त्यावर उतरल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. २०१०पासून लागू केलेल्या शासन निर्णयानुसार १२ वर्षे सेवा करण्याची तरतूद असल्याने या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश होते. घाटकोपर नारायणनगर येथील होमगार्डच्या प्रशिक्षण संस्थेबाहेर कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. शासनाविरोधात घोषणाबाजी करत या कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. नोटीस न देता कामावरून काढण्यात आल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. होमगार्ड कर्मचारी सुरेश करदावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९५पासून आम्ही येथे काम करतो. असे असताना कुठल्याही स्वरूपाची नोटीस न देता आम्हाला कामावर न घेता घरचा रस्ता दाखविण्यात आला. मात्र १२ वर्षे सवा करण्याचा निर्णय हा २०१०मध्ये झाला. त्यामध्ये आमचा दोष काय? नव्याने आलेल्या लोकांना तो लागू करावा, असे करदावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
होमगार्डचे तीनशे कर्मचारी रस्त्यावर
By admin | Updated: July 2, 2016 04:39 IST