पंढरपूर : तालुक्यातील भीमा नदीवरील कौठाळी व खेडभाळवणी येथील वाळू ठेक्यासाठी ठेकेदारांनी भरलेली तीन कोटी रुपयांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. कंत्राटातील अटी व शर्तीनुसार ठेकेदारांनी वाळू उपसा न केल्याने त्यांच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने ही कारवाई केल्याची माहिती तहसीलदार नागेश पाटील यांनी दिली़पंढरपूर तालुक्यातील कौठाळी- होळे येथील वाळू ठेक्याची तपासणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. शिवाय खेडभाळवणी- खेडभोसे वाळू ठेक्यावरही तहसीलदार पाटील यांच्यासह सोलापूर पोलिसांनी कारवाई केली होती. त्याचाही तपासणी अहवाल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यानुसार या दोन्ही वाळू ठेक्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाई करीत दोन्ही वाळू ठेक्यासाठी भरलेली सुमारे तीन कोटी अनामत रक्कम जप्त केल्याचे पाटील यांनी सांगितले.तसेच अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांना लगाम बसावा म्हणून जानेवारी २०१६ ते २५ जूनपर्यंत १३६ वाहनांवर कारवाई करून १ कोटी २८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गेल्या पाच महिन्यांत ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोहोरगाव, तालुका पंढरपूर येथील २४० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त करून त्याचा लिलाव करण्यात आला़ त्यातून शासनाच्या गंगाजळीत ३ लाख ८१ हजार रुपये जमा करण्यात आले. अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने धान्य गोदामात लावण्यात आली होती. अवैध वाळू उपसा करणाऱ्या ९ बोटी जप्त करण्यात आल्या, तर इसबावी व होळे येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या १२ बोटी नष्ट करण्यात आल्या. ६ बोटी धान्य गोदामात लावण्यात आल्या आहेत. या जप्त केलेल्या बोटी व होड्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)भीमा नदीपात्र कोरडे पडले आहे. पात्रातील वाळू उपसा करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी रस्ता दिला, त्या शेतमालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस देऊन ऐकत नसतील, तर त्यांच्या शेताच्या उताऱ्यावर बोजा चढविण्यात येणार आहे.- नागेश पाटील,तहसीलदार, पंढरपूर
वाळू ठेकेदारांची तीन कोटी अनामत जप्त!
By admin | Updated: July 4, 2016 04:08 IST